
0- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची माहिती
0- दिव्यांग, जेष्ठांसाठी ‘एडीआयपी’ तसेच
0- ‘वयोश्री’तंर्गत जिल्हास्तरीय मोजमाप शिबीर
0- जागतिक दिव्यांग दिनापासून नोंदणीस प्रारंभ
नांदेड : एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ता. २६ डिसेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन वितरण करण्यासाठी भव्य मोजमाप शिबिराचे भव्य आयोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. तीन) दुपारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, बापू दासरी, अलीम्कोचे विभागीय प्रमुख संजय मंडल, दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक नितीन निर्मल उपस्थित होते.
श्री. डोंगरे म्हणाले, की अस्थिव्यंगांसाठी तीन चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठ्या, सी पी चेअर देण्यात येणार आहे तर मोटराइज ट्रायसायकल साठी ८० टक्के दिव्यांगत्व असलेले प्रमाणपत्र व १२ हजार रुपये स्थानिक सहभाग गरजेचा आहे. अंध प्रवर्गासाठी ७५ टक्क्यावरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्याना स्मार्ट केन, ब्रेल कीट, डेसी प्लेअर, स्मार्ट फोन. मतिमंद प्रवर्गासाठी व्हीलचेअर, एम आर कीट, सी. पी. चेअर तर कर्णबधीर प्रवर्गासाठी श्रवणयंत्राचे वितरण करण्यात येणार आहे. ता. दहा ते ता. २६ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यासाठी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वनोंदणीसाठी संबधीत तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांनी अपंगत्व प्रमाणपत्र, चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्डच्या झेरॉक्स व दोन फोटोसह संपर्क साधावा, असे आवाहन श्री. डोंगरे यांनी केल.
एखादे अवयव नसेल तर दिव्यांगांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगांनाच माहित असते. दिव्यांग दिनाचे औचीत्य साधत एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे. भविष्यात स्वावलंबी जीवन जगण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पात्र दिव्यांगांनी एडीआयपी तसेच जेष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सत्येंद्र आउलवार यांनी केले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व तालुका स्तरावरील महसूल, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग आदी विभागाचे अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
तालुकानिहाय शिबीर
नांदेड येथे १० डिसेंबर, अर्धापूर ११, मुदखेड १२, भोकर १३, हदगाव १४, किनवट १५ व १६, माहूर १७, हिमायतनगर १८, लोहा १९, कंधार २०, नायगाव २१, मुखेड २२, देगलूर २३, बिलोली २४ धर्माबाद २५ तर उमरी येथे २६ डिसेंबर रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’
वाढत्या वयोमानानुसार जेष्ठ नागरिकांनाही कर्णदोष, दृष्टीदोष, अस्थिव्यंगत्व, दातांच्या व्याधी आदींचा त्रास होतो, यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना मोफत व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, चष्मे, दातांची कवळी आदी त्यांना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा बिपीएल कार्ड सादर करणे आवश्यक असल्याची माहिती श्री. डोंगरे यांनी यावेळी दिली.