अनुदान मिळेना, डे केअर सेंटर बंद! 

मधुकर कांबळे
गुरुवार, 27 एप्रिल 2017

औरंगाबाद - अनुदान देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हात आखडता घेतल्यामुळे नारेगाव येथे सुरू करण्यात आलेले डे केअर सेंटर गेल्या वर्षभरापासून बंद पडले आहे. आई-वडील कामावर गेल्यानंतर घरी कोणीच राहत नसल्याने गरीब कुटुंबातील मुले या डे केअर सेंटरमध्ये राहत होती. आता मात्र त्यांची हेळसांड होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हे डे केअर सेंटर सुरू केले होते. 

औरंगाबाद - अनुदान देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हात आखडता घेतल्यामुळे नारेगाव येथे सुरू करण्यात आलेले डे केअर सेंटर गेल्या वर्षभरापासून बंद पडले आहे. आई-वडील कामावर गेल्यानंतर घरी कोणीच राहत नसल्याने गरीब कुटुंबातील मुले या डे केअर सेंटरमध्ये राहत होती. आता मात्र त्यांची हेळसांड होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी हे डे केअर सेंटर सुरू केले होते. 

नारेगाव, ब्रिजवाडी परिसरात राहणारी बहुसंख्य कुटुंबे हातावर पोट असणारी आहेत. दिवस निघाला, की पोटाची खळगी भरण्यासाठी पती-पत्नी, घरातील कमावत्या व्यक्ती कामावर जातात. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या त्यांच्या मुला-मुलींची मोठी माणसे कामावर गेल्यानंतर मोठी पंचाईत व्हायची. या वयोगटातील मुले घरी एकटी सोडून जाणाऱ्या पालकांना एकीकडे मुलांची चिंता तर दुसरीकडे कामाची चिंता. अशा पालकांना या डे केअर सेंटरच्या माध्यमातून दिलासा मिळाला. तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी 2013 मध्ये नारेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर डे केअर सेंटर सुरू केले होते. या डे केअर सेंटरमध्ये 100 मुले शाळा सुटल्यानंतर येऊन थांबत. ग्रामविकास संस्थेमार्फत हे सेंटर चालवण्यात येत होते. मुलांच्या उपस्थितीनुसार 94 हजार ते 1 लाख 25 हजार रुपये दरमहा अनुदान यासाठी दिले जायचे. ग्रामविकास संस्थेचे नरहरी शिवपुरे यांनी सांगितले की, 2013 मध्ये हा राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्‍ट तत्कालीन आयुक्‍त डॉ. भापकर यांनी सुरू केला होता. महापालिका महिला व बालकल्याण विभागांतर्गत डे केअर सेंटरचे काम चालत होते. हातावर पोट असणारे, धुणीभांडी करणारे, कंपनीत कामाला जाणारे नवरा बायको डे केअर सेंटरमध्ये मुलांना सोडून निर्धास्तपणे कामावर जात होते. सुरवातीची दोन वर्ष डे केअर सेंटरला महापालिका प्रशासनाने मुदतवाढ दिली; मात्र नंतर मुदतवाढही दिली नाही आणि बिलही देणे बंद केले. त्याही परिस्थितीत आम्ही डे केअर सेंटर चालवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीचे आयुक्‍त श्री. बकोरिया यांच्याकडे मुदतवाढ देण्याविषयी व अनुदान देण्याविषयी निवेदने दिली. अखेर हे सेंटर बंद करणार असल्याचे त्यांना पत्र देऊन नोव्हेंबर 2016 पासून डे केअर बंद केले आहे. नवीन आयुक्‍त डी. एम. मुगळीकर यांनी या डे केअर सेंटरची शहरातील गरज लक्षात घेऊन पुन्हा सुरू केले तर ते चालवू, असे श्री. शिवपुरे म्हणाले. 

डे केअरमधील उपक्रम 
शाळा सुटल्यानंतर येणाऱ्या या मुलांचा अभ्यास घेणे 
मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे 
त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न. 
एक वेळचे जेवण आणि दोन वेळचा नाश्‍ता 
0 मनोरंजनासाठी खेळणी, टी. व्ही. 

Web Title: Day Care Center Closed