घरी राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली, लातूरातील चित्र !

विकास गाढवे
Saturday, 3 October 2020

  • रुग्णालयासोबत गृह विलगीकरणाची बरोबरी . 
  • होम आयोलेशनमधील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ
  • रुग्णसंख्येची तेराशेकडे वाटचाल 

लातूर : घरी राहून अर्थात गृह विलगीकरणातून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी गृह विलगीकरणातील रुग्णांचे ३५ टक्क्यांचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत गेले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यातूनच गृह विलगीकरणाने सरकारी रूग्णालय तसेच कोविड केअर सेंटरमधील रुग्णसंख्येची बरोबरी साधली आहे. गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता येत्या काळात रुग्णालयातील रुग्णांपेक्षा घरी राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यातच गृह विलगीकरणातील रुग्णांना प्रोत्साहन म्हणून प्रशासनाच्या वतीने किट देण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रातिनिधिक स्वरूपात अतिरिक्त एमआयडीसीतील कोविड केअर सेंटरच्या परवानगीने गृह विलगीकरणात जाणाऱ्या पंचवीस रुग्णांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. दोन) या कीट व गृह विलगीकरण मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, नवीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, मावळते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा, तहसीलदार स्वप्नील पवार, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, डॉ. माधव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक, डॉ. सुनीता पाटील, डॉ. आयेशा खान, ज्ञानेश्वर काळे, सुनंदा तुळजापुरे, एस. एस. कांबळे, टी. बी. भोजने व वर्षा चौधरी वर्षा यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आकडे बोलतात 
जिल्ह्यात सध्या दोन हजार ६४२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. यात सरकारी व खासगी रुग्णालय केअर सेंटरमधील एक हजार ४१९ तर गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या एक हजार २२३ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या १७ हजार ५१५ पैकी चार हजार २१ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यासाठी गृह विलगीकरणाचा मार्ग अवलंबला असून, त्यापैकी दोन हजार ७९८ रुग्णांनी घरी राहूनच कोरोनावर मात केल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन लाखात दोन हजार संशयित 
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत घरोघरी जाऊन सुरू असलेल्या तपासणीत मागील १६ दिवसांत तीन लाख दहा हजार २५ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात एक हजार ९२२ कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. सारी आजाराचे संशयित ७४२, सर्दी, खोकला व तापीचे दोन हजार ४८३, जुन्या आजाराचे ३८ हजार ११ तर अन्य आजाराचे सहा हजार २५५ रुग्ण आढळून आले आहेत. यातील दोन हजार ७२३ रुग्णांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाची बाधा जिल्ह्यातील ७८६ पैकी ५९९ गावांना पोचल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Day to day increase patients in Home Iolation Latur news