
पिशोर परिसरात महिला तलाठ्याला दमदाटी करून वाळू तस्कर ट्रॅक्टरसह फरारी
पिशोर (औरंगाबाद) : पिशोरसह परिसरात वाळू व गौण खनिजांचा अवैध उपसा आता दिवसाही सुरू झाला आहे.यावर स्थानिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही. याची प्रचिती गुरुवारी (ता.२६) आली. येथील महिला तलाठ्याने अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरला अडविले असता चालकाने व मालकाने महिला तलाठ्याला शिवीगाळ व दमदाटी करत घटनास्थळाहून पळ काढल्याची घटना घडली. पिशोर पोलिस ठाण्यात वाळू तस्कर मालक व चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
अडवल्यास धमकी
पिशोर सजाच्या तलाठी दीपाली बागूल व मंडळ अधिकारी राजुसिंग बेडवाल यांना पिशोर- सिल्लोड रस्त्यावर मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू असताना वाळूचा बेकायदा साठा असल्याची व या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी एक विनाक्रमांकाचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर येताना दिसले. ट्रॅक्टर मध्ये वाळू असल्याने चालकाला वाळूच्या रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. दरम्यान ट्रॅक्टरचा मालकसुद्धा या ठिकाणी पोहचला. तलाठी बागुल यांनी ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घेण्याचे सांगताच चालक व मालक यांनी यांनी महिला तलाठी बागुल यांना दमदाटी केली. महिला तलाठ्याला बाजूला सारत आदर्श मंगल कार्यालयाजवळ वाळू टाकून ट्रॅक्टरसह चालक व मालक यांनी घटनास्थळाहून पोबारा केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मंडळ अधिकारी राजुसिंग बेडवाल, तलाठी दीपाली बागुल, कोतवाल हरून शेख, रशिद शेख यांनी आदर्श दूध डेअरी जवळील पाच ब्रास वाळू व ट्रॅक्टर मधील एक ब्रास अशा एकूण सहा ब्रास वाळूचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला. श्रीमती बागुल यांच्या तक्रारीवरून चालक उत्तम लक्ष्मण मोकासे व मालक विनोद जगन्नाथ शिंदे (दोन्ही रा.पिशोर) यांच्या विरुद्ध पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार माधव जरारे करीत आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खुलेआम तस्करी
पिशोर, निंभोरा, देवपूळ, वासडी, खातखेडा, पळशी, साखरवेल, रामनगर,शफेपूर,नादरपूर,भारंबा आदी गावात अंजना नदीच्या पात्रातून जवळपास २० ते २५ ट्रॅक्टर खुलेआम वाळू तस्करी करतात. पूर्वी केवळ रात्री चालणारा हा धंदा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने आता दिवसाढवळ्या सुरू झाला आहे.
मागील दीड महिन्यात माध्यमांनी याचा पाठपुरावा केला. सुरुवातीला पाच ते सहा दिवस हा प्रकार बंद झाला. परंतु मागील काही दिवसांपासून वाळू वाहतूक मात्र पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली.
पाच पुरुष तलाठी, कारवाई मात्र महिला तलाठयाकडून
पिशोर मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा तलाठ्यांपैकी पाच तलाठी पुरुष आहेत आणि केवळ एक तलाठी महिला आहे. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध महिला तलाठी कारवाई करण्याचे धाडस दाखवते परंतु पुरुष तलाठी मात्र मूग गिळून गप्प बसतात, याविषयी चर्चा होत आहेत.
येत्या चार दिवसांत एक पथक तयार करणार आहोत. यानंतर अंजना नदीपात्रातील वाळूचा व इतर गौण खनिजाचा एक खडा उचलला जाणार नाही. वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करू.
-राजूसिंग बेडवाल, मंडळ अधिकारी
(संपादन-प्रताप अवचार)