परंडा तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांनी आणला मृतदेह

आनंद खर्डेकर
रविवार, 3 जून 2018

ब्रह्मगाव येथील स्मशानभूमीच्या जागेचा वाद गेल्या काही वर्षांपासून चिघळला आहे. गावात अत्यंविधीच्या वेळी कायम वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.

परंडा - अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीच्या जागेचा वाद निर्माण झाल्यामुळे ब्रह्मगावात (ता. परंडा) एकाचा मृतदेह नातेवाईकांनी येथील तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर सकाळी 10 वा. पासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रह्मगाव येथील स्मशानभूमीच्या जागेचा वाद गेल्या काही वर्षांपासून चिघळला आहे. गावात अत्यंविधीच्या वेळी कायम वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकवेळा केलेली असतानाही स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही. मोजणी करून जागा निश्चित करून स्मशानभूमीच्या जागेचा वाद तातडीने मार्गी लावावा, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. 

ब्रह्मगाव येथील निवृत्ती सोपान क्षीरसागर (वय १०६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (ता. 2) सायंकाळी पाच वाजता परंडा येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी ब्रह्मगाव येथे सायंकाळी सात वाजता नातेवाईक घेऊन गेले. मात्र तेथे स्मशानभूमीच्या जागेचा वाद निर्माण झाला. त्यामुळे रविवारी (ता. 3) विश्वनाथ क्षीरसागर हे नातेवाईकासह वडिलांचा मृतदेह घेऊन परंडा येथील तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसील कार्यालयासमोर हा मृतदेह ठेवण्यात आला. नातेवाईक, लोकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंबी, परंडा, भूम येथून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

दरम्यान, स्मशानभूमीचा जागेचा वाद निर्माण झाल्याने तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ब्रह्मगाव येथे दाखल झाले. दुपारी दोनपर्यंत शानभूमीच्या जागेचा प्रश्न सुटला नव्हता. त्यामुळे मृतदेह तहसील कार्यालयासमोरच होता. पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The dead body brought before the Paranda Tehsil office