हमीभावने मक्‍का खरेदीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

  • जिल्ह्यात दहा केंद्रावर नोंदणी व खेरेदी 
  • न डागाळलेले मक्‍याला 1 हजार 760 रूपये प्रतिक्‍विंटलचा दर
  • बाजारात साधारणत: 18 टक्‍के आर्द्रता मक्‍का विक्रीला 
  • जिल्ह्यात जवळपास 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर मकाचे पीक

औरंगाबाद: उत्पादित मक्‍याला किमान आधारभूत किमत मिळावी यासाठी जिल्ह्यात दहा हमी भावाने मक्‍का खरेदी केंद्र सुरू करण्याला मान्यता मिळाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबक्‍धित केंद्रांवर नाव नोंदणी व करता येणार असून, त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार आहे.

 
जिल्ह्यात जवळपास 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर मकाचे पीक होते. सुरवातीला मक्‍यावर लष्करी अळीचे आक्रमण झाले. त्यामधून कसेबसे वाचलेल्या मक्‍का पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. उत्पादित मक्‍काला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली. आता उत्पादित मक्‍याला किमान आधारभूत दर मिळावा यासाठी जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, लासूर, वैजापूर, पैठण, कन्नड, खुलताबाद, करमाड, फुलंब्री या दहा ठिकाणी हमीभावने खरेदी केंद्रांना मंजूरात देण्यात आली आहे. 

या केंद्रावर मका उत्पादकांना ऑनलाइन नोंदणी व नोंदणी केलेल्या मक्‍का उत्पादकांकडून मकाची खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. स्वच्छ व 14 टक्‍के आर्द्रत असलेले, न डागाळलेले अशा मक्‍याला या केंद्रावरून 1 हजार 760 रूपये प्रतिक्‍विंटलचा दर हमी भाव दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने अजूनही अनेक भागातील जमीन वापस्यावर नाही. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मकाला कोंब आले होते. बाजारात येणाऱ्या मका मध्ये साधारणत: 18 टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता येत असतांना हमी दराने खरेदीसाठी 14 टक्‍के आर्द्रतेची अट घातली गेली आहे. त्यामुळे हमी दराने मकाची खरेदी होईल की नाही हा प्रश्‍न आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deadline for Maize parchacse till 31 December