औरंगाबाद : रस्त्यांची डेडलाइन पुन्हा डेड!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दीड वर्षापूर्वीच दिला. मात्र, त्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांचे एकही काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. महापौर, आयुक्तांनी दोनवेळा पाहणी केली. रस्तेकामाला गती द्या; अन्यथा कंत्राटच रद्द करण्याची तंबीही कंत्राटदारांना दिली. तरी रस्त्यांची कामे पूर्णत्वास जात नसल्याने महापालिका कंत्राटदारांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे 31 जुलैच्या डेडलाइनबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद - राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दीड वर्षापूर्वीच दिला. मात्र, त्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्यांचे एकही काम अद्याप पूर्णत्वास गेले नाही. महापौर, आयुक्तांनी दोनवेळा पाहणी केली. रस्तेकामाला गती द्या; अन्यथा कंत्राटच रद्द करण्याची तंबीही कंत्राटदारांना दिली. तरी रस्त्यांची कामे पूर्णत्वास जात नसल्याने महापालिका कंत्राटदारांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे 31 जुलैच्या डेडलाइनबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

एकूण तीस रस्त्यांपैकी सध्या 19 रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, प्रारंभी सुरू केलेल्या रस्त्यांपैकी एकाही रस्त्याचे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यात काही रस्त्यांची कामे 50 ते 60 टक्‍क्‍यांहून अधिक होऊ शकली नाहीत. दरम्यान, गेल्या आठवड्यातच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची पाहणी केली. तेव्हा कंत्राटदारांकडून फारच धिम्या गतीने काम केले जात आहे, हे लक्षात आल्याने त्यांनी संबधित कंत्राटदारांना कामाची गती वाढवा, असे आदेश दिले. तसेच अधिकाऱ्यांनादेखील लक्ष ठेवून कंत्राटदारांकडून गतीने काम करून घेण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांच्या पाहणीनंतर दुसऱ्याच दिवशी महापौरांनी रस्तेकामांची माहिती घेतली. त्यात पाच महिन्यांपासून कामे सुरू असताना अद्याप एकही रस्ता पूर्ण झाला नसल्याचे समोर आले. अपूर्ण रस्तेकामांमुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रस्तेकामांची गती न वाढल्यास वेगळा विचार केला जाईल, अशी तंबीही आयुक्तांपाठोपाठ महापौरांनी कंत्राटदारांना दिली. प्रारंभी सुरू केलेल्या कोणत्याही पाच रस्त्यांची कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण होतील, असा दावाही त्यांनी केला होता.  त्यानंतर 31 जुलैची तारीख सांगण्यात आली. मात्र, आता जुलै संपत आला तरी यापैकी एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सोमवारी (ता. 29) पाच रस्त्यांच्या पूर्णत्वाला डेडलाइन देण्याचे टाळत हतबलता दर्शविण्यात आली. 
 
कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष 
रस्त्यांच्या कामांवर व गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता कक्षाचे प्रमुख उपअभियंता एम. बी. काझी यांच्याकडे आयुक्तांनी जबाबदारी सोपविली आहे. मात्र, अद्याप कंत्राटदारांनी करारानुसार साईटवर रस्त्यांच्या तांत्रिक तपासणीसाठी स्वतःच्या लॅबही सुरू केलेल्या नाहीत. थर्ड पार्टीचा अहवाल न तपासताच कंत्राटदारांना बिले दिली जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for road work in Aurangabad