इतवारा येथे दोघांवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

या प्रकरणी परस्परांविरूद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक शालिनी गजभारे यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

नांदेड : जुन्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (ता.4) रात्री अकराच्या सुमारास जुन्या नांदेड भागातील पहेलवान टी हाऊस परिसरात घडली. या प्रकरणी परस्परांविरूद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक शालिनी गजभारे यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

इतवारा भागातील मोमीनपूरा दिवानी बावडी परिसरात राहणारे अब्दुल मोहीत असुल हक्क आणि मोहमद रफिक मोहमद इब्राहीम यांच्यात जुना वाद होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपापसातील वाद मिटवून घेतला होता. मात्र, धनादेश बँकेत वठला नसल्याने या दोघात पुन्हा वाद उफाळून आला. गुरूवारी (ता. चार) रात्री अब्दुुल मोहीत हे आपल्या घराकडे दुकान बंद करून निघाले होते. यावेळी पहेलवान टी हाऊसजवळ थांबलेल्या मोहम्मद रफीक, मोहम्मद साहेब, मोहम्मद सरवरअली व त्याचा पुतण्या आणि मोहम्मद एजाज यांनी अब्दुल मोहीत यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. कत्तीने डोक्यावर मारलेला वार चुकवून त्यांनी तो वार हातावर झेलला. यात अब्दुल गंभीर जखमी झाले. त्यांना पायावर व शरीराच्या अन्य भागावर जबर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

अब्दुल मोहीत यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन मारहाण करणाऱ्या मोहम्मद रफीक, मोहम्मद इब्राहीम या दोघांवर लोखंडी सुरीने वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. मोहम्मद रफीक यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद मोहीद, मोहम्मद जमील, मोहम्मद वकील अब्दुल हक यांच्यावर तर अब्दुल वहीद यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद रफीक, मोहम्मद साहेब, मोहम्मद सरवरअली आणि मोहम्मद एजाज यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शालिनी गजभारे आणि एपीआय पठाण हे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadly attacks on two persons in Itwara area