रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रक्षाबंधनाचा सण साजरा करून रांची येथे सैन्यात कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा हिंगोली जवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.27) पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिंगोली: रक्षाबंधनाचा सण साजरा करून रांची येथे सैन्यात कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा हिंगोली जवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.27) पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी येथील प्रविण शिवाजी गायकवाड (वय 23) वर्षे हे रांची येथील महार रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे. ता. 30 जुलै रोजी ते  एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रविवारी (ता .26) दुपारी ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाले होते. मात्र रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर अंधारवाडी शिवारात रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली, तर हात तुटलेल्या अवस्थेत होता. तसेच, चेहऱ्यावरही गंभीर जखम झाल्याचे ट्रॅकमन चंदनकुमार दास यांना दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती रेल्वे पोलिस व हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू ठोके, जमादार रवीकांत हरकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा जवान गायकवाड यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. जवान गायकवाड यांचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्यात भरती झालेल्या जवान प्रविण गायकवाड यांच्या पश्चात  आई वडील दोन बहिणी व भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान जवान गायकवाड काल सकाळीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून कर्तव्यावर जाण्यासाठी निघाल्याचे ही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत व्हाट्सअप वर ऑनलाइन होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचे त्यांचे भाऊ बंडू गायकवाड यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार शिवा पोले यांनी रांची येथे सैन्याच्या कार्यालयास दिली आहे.

Web Title: Death soilder after coming out of the Rakshabandhan program