सोयगाव तालुक्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

जरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.

जरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे.

जरंडी येथे लोहारकाम करणारे सुनील पंडित लोहार (वय ३९) हे रविवारी दिवसभर भात्याजवळ काम करीत होते. भात्याची उष्णता आणि उन्हामुळे वाढलेले तापमान यामुळे सुनील लोहार यांना चक्कर आल्याने रविवारी रात्री त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रात्रभर उलट्या, डोकेदुखी अशक्तपणा आदी त्रास वाढल्यामुळे त्यांना सोमवारी जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 

सोयगाव परिसरात गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे, सकाळी नऊ वाजेपासून उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जळगाव, भुसावळच्या सीमारेषेवर असलेल्या सोयगाव तालुक्‍यात पारा ४४ अंशाच्या वर गेला आहे. चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.  कडक उन्हात काम करणे किंवा घराबाहेर जाणे टाळावे, बाहेर जाणे अत्यावश्‍यक असेल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी रूमाल, स्कार्फ, टोपी किंवा छत्रीचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून सोयगावला उष्माघात उपचार कक्षाची तातडीने स्थापना करण्यात आली असून चोवीस तास या कक्षात रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: death by sunstroke