कागदाच्या बंडलाखाली गुदमरून ट्रकचालक, क्‍लिनरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

 चंद्रपूर येथून झेरॉक्‍स पेपरची बंडले घेऊन बार्शीकडे (जि. सोलापूर) जाणारा ट्रक मुखेड ते शिरूर ताजबंद रस्त्यावरील उमरगा (रेतू, ता. जळकोट) येथे शनिवारी (ता. दहा) पहाटे दोन वाजता उलटला. डुलकी लागल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. जागे असलेल्या क्‍लिनरने ट्रक रस्त्याच्या खाली जात असल्याचे पाहून तातडीने उडी मारून ब्रेक दाबला. पण यात झेरॉक्‍स पेपरची बंडले पुढे आल्याने ट्रकच्या केबीनचा चेंदामेंदा झाला, या बंडलांखाली सापडल्याने ड्रायव्हर आणि क्‍लिनरचा गुदमरून मृत्यू झाला. 

जळकोटः  चंद्रपूर येथून झेरॉक्‍स पेपरची बंडले घेऊन बार्शीकडे (जि. सोलापूर) जाणारा ट्रक मुखेड ते शिरूर ताजबंद रस्त्यावरील उमरगा (रेतू, ता. जळकोट) येथे शनिवारी (ता. दहा) पहाटे दोन वाजता उलटला. डुलकी लागल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. जागे असलेल्या क्‍लिनरने ट्रक रस्त्याच्या खाली जात असल्याचे पाहून तातडीने उडी मारून ब्रेक दाबला. पण यात झेरॉक्‍स पेपरची बंडले पुढे आल्याने ट्रकच्या केबीनचा चेंदामेंदा झाला, या बंडलांखाली सापडल्याने ड्रायव्हर आणि क्‍लिनरचा गुदमरून मृत्यू झाला. 
सकाळी व्यायामासाठी गेलेल्या उमरगा रेतू येथील ग्रामस्थांना अपघातग्रस्त ट्रक दिसून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आणि त्यांची ओळख पटवली. पोलिसांनी सांगितले, की चंद्रपूर येथून ट्रक (एमएच 09 बीए 1551) झेरॉक्‍स पेपरची बंडले घेऊन बार्शीकडे जात होता. मुखेड - शिरूर ताजबंद रस्त्यावर उमरगा रेतू पाटीजवळ आल्यानंतर ट्रकचालक हणमंत गुंडप्पा (वय 34, रा. होरटी, जि. विजापूर) याला डुलकी लागली. यात त्याचा ट्रकवरील ताबा सुटला व ट्रक रस्त्यावरून खाली खड्ड्यात जाऊ लागली.

क्‍लिनर आनंदा बालप्पा गोड - बिरादार (वय 26, रा. वळवाट, जि. विजापूर) हा जागा होता. त्याला ट्रक खाली जात असल्याचे दिसून येताच. त्याने चालकाच्या जाग्यावर जाऊन जोरात ब्रेक दाबला. यामुळे ट्रक जागेवर थांबला पण पाठीमागील झेरॉक्‍स पेपरची बंडले पुढे येऊन पडली. यात ट्रकच्या केबीनचा चेंदामेंदा झाला आणि चालक आणि क्‍लिनर खाली पडले. त्यांच्या अंगावर सर्व बंडले पडली. यात गुदमरून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सकाळी व्यायामासाठी फिरायला आलेल्या ग्रामस्थांना ट्रक दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्यासह पोलिसांनी तातडीने बंडले हटवली तेव्हा चालक व क्‍लिनरचे मृतदेह एकमेकांच्या अंगावर होते. काही वेळेपुर्वीच क्‍लिनरने ट्रकमालकाला फोन केला होता. तिथे पडलेल्या मोबाईलवरून ट्रकमालकाला पोलिसांनी फोन केला. त्याला मृतदेहाचे वॉटुसअपवरून फोटो पाठवल्यानंतर दोघांची ओळख पटली. वांजरवाडा (ता. जळकोट) प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a truck driver, cleaner under a bundle of paper