एसटीचे उत्पन्न बुडाले अतिवृष्टीत, 54 लाखांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. गेल्या बारा दिवसांत एक लाख 91 हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्याने एसटीचा तब्बल 54 लाख 76 हजार 847 रुपयांचा महसूल अतिवृष्टीत बुडाला आहे. 

औरंगाबाद - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. गेल्या बारा दिवसांत एक लाख 91 हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द झाल्याने एसटीचा तब्बल 54 लाख 76 हजार 847 रुपयांचा महसूल अतिवृष्टीत बुडाला आहे. 

राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार माजवला. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा व परिसरात अतिवृष्टीने रेकॉर्ड मोडले आहेत. या अतिवृष्टीमध्ये एसटी महामंडळाचे राज्यभरात प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बसगाड्या जाऊ शकल्या नाहीत, अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. बसगाड्या रद्द कराव्या लागल्याने औरंगाबाद विभागालाही मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात जाणाऱ्या औरंगाबाद विभागाच्या 1,585 फेऱ्या म्हणजे 1,91,710 किलोमीटर प्रवास रद्द करावा लागला. यामुळे तब्बल 54,76,847 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 
 
बंद असलेले मार्ग 
तेरा दिवसांच्या अतिवृृष्टीच्या काळात औरंगाबादवरून सांगली, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, बुलडाणा, बोरीवली, मुंबई, सिल्लोड, रायपूर, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, कन्नड आणि नागापूर या ठिकाणची एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. अतिवृष्टीनंतर ज्याप्रमाणे रस्ते मोकळे होत गेले त्याप्रमाणे एसटी महामंडळाने या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. 
 
अशा झाल्या फेऱ्या रद्द 
1 ऑगस्टला 125 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. 2 ऑगस्टला 72, 3 रोजी 88, 4 रोजी 207, 5 रोजी 266, 6 रोजी 117, 7 रोजी 116, 8 रोजी 193, 9 रोजी 193, 10 रोजी 124, 11 रोजी 58 तर 12 ऑगस्टला 26 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decreased in ST income