esakal | जिंतूर येथे मेडीटेक कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड

जिंतूर येथे मेडीटेक कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाढीप्रमाणेच रुग्ण गंभीर होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे आजाराचे निदान व उपचारास विलंब असल्याने आजाराचे लवकर निदान होऊन रुग्णास त्वरित व माफक दरात उपचार मिळावे या उदात्त हेतूने स्व. डॉक्टर शांताराम दहिफळे मेमोरियल हॉस्पिटल संचलित शहरातील जालना रोड, येथे उभारण्यात आलेल्या मेडिटेक केअर सेंटरचे रविवारी (एक मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, कोरोना प्रतिबंध नियमावलीचे पालन करुन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

या सेंटरमध्ये दहा वातानुकूलित ऑक्सीजन बेड, दहा जनरल बेड, महिलांकरिता स्वतंत्र कक्ष, एन. आय. व्ही. व्हेंटिलेटर, ऑक्‍सीजन काँन्संस्टेटर, डिब्रीलेटर, ई. सी. जी., नॉन कोविड आयसीयु., सेंट्रल ऑक्सिजन, अपघात विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा - शिवसेना व युवासेनेच्या वतीने मेहेकरमध्ये कोविड सेंटर सुरु -

यानिमित्त सकाळचे बातमीदार राजाभाऊ नगरकरच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सभापती रामराव उबाळे, डॉ. सूर्यकांत चवंडके, डॉ. नरेश होलाणी, डॉ. राजेश मुंढे, डॉ. शिवप्रसाद सानप, डी. एम. शेप, ॲड. कार्तिक मुंढे, मधुकरराव घुगे, सुरेश नागरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सबियाबेगम कपिल फारुकी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केअर सेंटरचे संचालक डॉ. योगेश दहिफळे म्हणाले, कोरोनाची लक्षणे दिसल्यापासून पाच दिवसांच्या आत रुग्णांनी आजाराचे लवकर निदान करुन घेऊन त्वरित उपचार घ्यावेत. मी मागील वीस वर्षापासून शहरात खाजगी वैद्यकीय व्यवसाय करत असताना काही पूर्वीचे जुने रुग्ण उपचारासाठी कोरोना साथीत येत आहेत. परंतु मी त्यांच्यावर उपचार करु शकत नव्हतो. त्यामुळे त्यांना सार्वजनिक आरोग्य संस्थेकडे पाठवावे लागत होते. याचे मला फार वाईट वाटत असल्याची खंत मनात बाळगून मेडीटेक कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. या सेंटरच्या माध्यमातून अगदी माफक दरात रुग्णांची सेवा करण्याची माझी मनोकामना आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करुन डॉ. दहिफळे यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी शहरातील डॉक्टर, पत्रकार व व्यापारी उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. निशांत मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. सचिन कडे, डॉ. शिवाजी घुगे, रामदास वाघ, अतूल रुद्रवार व सेन्टरच्या कर्मचाऱ्यांनी अति प्रयत्न केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image