स्मार्ट कामांना विलंब फार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

खर्च फक्त 50 कोटी, 283 कोटींवर मिळाले 30 कोटींचे व्याज 

औरंगाबाद- स्मार्ट सिटी योजनेच्या कामांची कासवगती कायम आहे. त्यामुळे अद्याप कोट्यवधी रुपयांचा निधीही पडून असून, गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या 283 कोटींपैकी फक्त पाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. या निधीवर आतापर्यंत तब्बल 30 कोटींचे व्याज मिळाले आहे. 

केंद्र शासनाच्या महत्त्वकांशी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा तीन वर्षांपूर्वी समावेश झाला. त्यानंतर कोट्यवधी रुपयांचे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून स्मार्ट सिटीची मोठ-मोठी स्वप्न शहरवासीयांना दाखविण्यात आली; मात्र शहर बस, महापालिका मुख्यालयाच्या इमारतीवर बसविण्यात आलेले सौर पॅनेल वगळता इतर कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. या योजनेअंतर्गत शहरात एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यात केंद्र शासन 500 कोटी राज्य शासन 250 कोटी तर महापालिकेचा 250 कोटीचा हिस्सा असेल. महापालिकेने अद्याप या योजनेसाठी एक रुपयाचा निधी दिला नसला तरी केंद्र व राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 283 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे; पण यातील केवळ 50 कोटी रुपये खर्च झाले आहे तर 233 कोटी रुपये बॅंकेत पडून आहेत. या निधीवर आतापर्यंत 30 कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. 
 
दुसऱ्या टप्प्याचा निधीची प्रतीक्षा 
स्मार्ट सिटीतून करायच्या कामाची यादी सुमारे सातशे कोटीवर गेली आहे. त्यामुळे महापालिकेला दुसऱ्या टप्प्याच्या निधीची प्रतीक्षा आहे; पण आधीचाच निधी खर्च न झाल्यामुळे पुढील निधी मागणेही स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डासाठी अवघड झाले आहे. आधीचा निधी खर्च केल्याचे प्रमाणपत्र सादर करा, त्यानंतरच पुढच्या टप्प्यातील निधी देऊ असे शासनाने स्पष्ट केले आहे. 
 
आतापर्यंत खर्च झालेली अंदाजे रक्कम 
बस खरेदी- 25 कोटी 
एमएसआय- 17 कोटी 80 लाख 
एसटी महामंडळ- 3 कोटी 50 लाख 
आस्थापना खर्च- 2 कोटी 
--------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay for smart jobs