भारती उद्योगांशी दुरगामी मैत्री हवी - डॉ. ग्याम्फी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

उद्योगांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (ता. 28) औरंगाबादेत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

औरंगाबाद - भारतीय उद्योग जगताकडे असलेल्या पारदर्शकतेमुळे त्यांच्यासह काम करणे सोयीचे आहे. भारतीय उद्योगांशी दुरगामी संबंध स्थापन करुन दोन्ही राष्ट्रांच्या उद्योगांना अधिक फायदा होण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे असोसिएशन ऑफ घाना इंडस्ट्रिज (एजीआय) चे अध्यक्ष डॉ. याव अदू ग्याम्फी यांनी सांगितले. 

उद्योगांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (ता. 28) औरंगाबादेत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय उद्योजक हे अमेरिका आणि अन्य राष्ट्रांच्या तुलनेने अधिक पारदर्शक आहेत. घाना आणि भारताच्या संस्कृतीत काही साम्य आहेत. त्यामुळे पश्‍चिमी राष्ट्रांपेक्षा भारताशी औद्योगिक संबंध ठेवणे अधिक चांगले आणि सोयीचे असल्याचे एजीआय अध्यक्ष डॉ. याव अदू ग्याम्फी यांनी सांगितले. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये त्यांनी दिवसभर भेटी देत कंपन्यांची माहिती घेतली. घानामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्या आणि तेच उत्पादन असलेल्या भारतीय कंपन्यांना एकत्र आणुन युरोपीय आणि पश्‍चिमी बाजारपेठ हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्टं केले. यावेळी चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रीकल्चर चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांची उपस्थिती होती. 

भारतीयांकडे तंत्रज्ञान, घानाकडे कच्चा माल 
आमच्या मायदेशात कोको, कॉफी, अननस, काजू, संत्रा, लाकूड, आंबा आदी वस्तुंचे मोठे उत्पादन आहे. भारतीय कंपन्यांकडे यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान आहे. याचा आधार घेत भारतीय कंपन्यांशी भविष्य वेधणारी मैत्री करण्याचा आपला प्रयत्न आहे. या अंतर्गत भारतीय कंपन्यांनी यावे आणि घानामध्ये आपल्या तंत्रज्ञानासह या कच्चा मालावर प्रक्रिया करुन उत्पादन घ्यावे असे आवाहन डॉ. याव अदू ग्याम्फी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले. 

भारतात येण्यात रस 
"ऑरिक'मध्ये उद्योग थाटण्याबाबत घानाच्या कंपन्या उत्सुक असल्याचे विचारले असता डॉ. याव यांनी त्यावर सकारात्मकता दर्शवली. येथील धोरणे उद्योग थाटण्यास फायदेशीर असतील तर येथेही घानाच्या कंपन्या येतील. लहान पाऊले टाकुन मोठे बदल घडवण्याकडे आपला कल आहे. ही मैत्री दिर्घकालीन असावी अशी आपली अपेक्षा असल्याचे ते शेवटी म्हणाले.

Web Title: Delegation of Ghana Industrial Association visits in Aurangabad