दिल्ली दरवाजाचे दगड निखळून पडले रस्त्यावर

Delhi-Door
Delhi-Door

दौलताबाद - ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याच्या सातव्या तटबंदीत असलेल्या दिल्ली दरवाजाचे अस्तित्व धोक्‍यात आले असून, हळूहळू अवजड वाहने धडकून या दरवाजाचे चिरेबंदी दगड निखळत आहेत. बुधवारी (ता. एक) दुपारी बाराच्या सुमारास एक अवजड चारचाकी वाहन भरधाव वेगाने दरवाजातून जात असताना खिळखिळे झालेले दरवाजाचे मोठमोठे दगड निखळले व रस्त्याच्या मधोमध पडले. यामुळे सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. 

दगड पडले त्यावेळी तेथून कुठलेही वाहन जात नसल्याने मोठी हानी टळली. या दरवाजाचे दगड कोसळण्याचा मार्गावर असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने यापूर्वीच दिले होते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयीही वेळोवेळी वृत्त दिले आहे. आजही ‘सकाळ’च्या माध्यमातून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून, तत्काळ दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्यात आले.

या घटनेनंतर दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ, शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक एस. आर. खरोटे यांच्यासह भारतीय पुरातत्त्व विभागाचे संजय रोहनकर, महसूल विभागाचे आर. एस. शेळके, सरपंच पवन गायकवाड, सय्यद शेरू यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साह्याने अगोदर रस्त्यातील मलबा हटवला व वाहतूक सुरळीत केली. त्यांना अग्निशमन विभागाचे अब्दुल अजीज, शेख रशीद, छगन मुंगसे, शेख इसाक, विजय कोथमिरे, अशोक खोतकर यांनी मदत केली. यानंतर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने श्री. रोहनकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ खिळखिळ्या झालेल्या दरवाजाच्या वरील भागाची दुरुस्ती करून अपघात टाळण्यासाठी डागडुजी केली. सदर तटबंदी, दरवाजा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असून, या दरवाजात नेहमीच वाहतूक ठप्प होते. यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नऊशे वर्षांपासून मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या या ऐतिहासिक वारशाची हेळसांड होऊन तो नामशेष होत आहे. पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी यांच्या सूचनेनुसार श्री. रोहणकर यांनी हे दुरुस्तीचे काम केले.

वाहतुकीचा कायम खोळंबा
एक किलोमीटर आधी पहिली तटबंदी दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या तटबंदीला खिंडार पाडून महामार्गाची निर्मिती केल्याचे लक्षात येते. घाट खाली असलेल्या दिल्ली दरवाजातून एकावेळी एकच वाहन जात असल्याने वाहतुकीचा दररोज खोळंबा होतो. नियोजित पर्यायी वळण रस्त्याची संचिका दोन वर्षांपासून मुंबई, दिल्ली कार्यालयांचा प्रवास करीत असल्याने अद्याप प्रलंबित आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाकडे तटबंदी सोपवावी
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की चार वर्षांपूर्वी ही तटबंदी आमच्या विभागाकडे सोपवावी यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय कार्यालयाला पाठविला आहे. केंद्रीय कार्यालयाच्या नियमानुसार स्थानिक प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतर ती तटबंदी आम्ही ताब्यात घेऊ. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com