रुग्णालयाच्या पायरीवरच प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

उस्मानाबाद - आरोग्य केंद्रात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सहन कराव्या लागतात. येथील शासकिय महिला रुग्णालयातही गुरुवारी (ता.२७) असाच संतापजनक प्रकार घडला. सकाळी नऊपासून प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले नाही. अखेर दुपारी तीन वाजता तिने रुग्णालयाच्या पायरीवरच गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतरही तिला दाखल करून घेण्याऐवजी असंवेदनशील प्रशासनाने सदर महिलेला सफाई करावयास सांगितले. हे ऐकून संतापलेल्या नागरिकांचा पवित्रा पाहून प्रशासनाचे धाबे दणाणले.

उस्मानाबाद - आरोग्य केंद्रात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सहन कराव्या लागतात. येथील शासकिय महिला रुग्णालयातही गुरुवारी (ता.२७) असाच संतापजनक प्रकार घडला. सकाळी नऊपासून प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले नाही. अखेर दुपारी तीन वाजता तिने रुग्णालयाच्या पायरीवरच गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतरही तिला दाखल करून घेण्याऐवजी असंवेदनशील प्रशासनाने सदर महिलेला सफाई करावयास सांगितले. हे ऐकून संतापलेल्या नागरिकांचा पवित्रा पाहून प्रशासनाचे धाबे दणाणले.

गेल्या महिन्यातच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाकडून होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले. त्यानंतर काही मागण्याही पदरात पाडून डॉक्‍टर निवांत झाले; मात्र अनेकवेळा रुग्णालयात होणाऱ्या हेळसांडीमुळे रुग्णांच्या जिवाला धोका संभवतो. येथील महिला रुग्णालयाच्या प्रशासनाकडून गुरुवारी एका गर्भवती मातेला अशी हेळसांड सहन करावी लागली. कसबे तडवळा येथील सपना पवार ही गर्भवती माता आज सकाळी नऊच्या सुमारास दाखल होण्यासाठी आली; परंतु तिला दाखल करून घेण्यात आले नाही. प्रसूत वेदनेने विव्हळणारी महिला रुग्णालयाच्या पायऱ्यावर सकाळपासून बसून होती; पण तिच्याकडे रुग्णालयातील एकाही कर्मचारी, अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. 

दुपारी तीन वाजेच्या सुमारास ती महिला चक्क पायऱ्यावरच प्रसूत झाली. त्यानंतरही तिला व नवजात बाळाला दाखल करून घेण्याऐवजी त्या ओल्या बाळांतणीला पायरी साफ करण्यास सांगण्यात आले.  घडलेला धक्कादायक प्रकारानंतरही रुग्णालय प्रशासनाचा उर्मटपणा पाहून संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरवात केली. वातावरण चांगलेच तापल्याने रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. नातेवाईकांनी आरडाओरड केली असता प्रशासनाने नातेवाईकच कसे दोषी आहेत, याचा पाढा वाचून बचावाचा पवित्रा घेतला; मात्र घडलेला सर्व प्रकार पाहिलेल्या नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत महिलेची अवस्था पाहूनही एकही कर्मचाऱ्याने तिची दखल घेतली नसल्याच्या तक्रारी केल्याने प्रशासनाने नमते घेतले. तक्रारींचा पाढा ऐकून प्रकरण निवळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी स्वत: सदर महिलेला दाखल करून घेण्यासाठी आले; परंतु प्रसूत महिलेने तुमच्या उपकाराची गरज नाही, असे खडसावून सांगितले. सुदैवाने प्रसूत महिला व बाळ सुखरूप असल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. त्यानंतर सदर महिला बाळाला घेऊन रिक्षातून नातेवाईकांसह निघून गेली.

दरम्यान, प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता सदर महिलेला दाखल करण्यात आले होते; मात्र ती महिला स्वतःच बाहेर येऊन थांबली होती, असे सांगण्यात आले; परंतु नोंदवहीमध्ये महिलेची नोंदच झालेली नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आला. रुग्णालयात असलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

‘फुकट डिलिव्हरी होत नसते’
नातेवाईकांकडे विचारणा केली असता त्यांनी सकाळपासून रुग्णालयात आल्याचे सांगितले; मात्र रुग्णालात दाखल करून घेण्याऐवजी ‘फुकट डिलिव्हरी होत नसते’, असे म्हणत पैशाची मागणी करण्यात आली. मोजकेच पैसे सोबत असल्याने काहीच पैसे नव्हते; पण तरीही गर्भवती मातेची अवस्था पाहून दाखल करून घेतील, अशी आशा होती; मात्र अखेरपर्यंत आम्हाला आत घेतले नाही. या सर्व प्रकारानंतरही आमची मुलगी व नवजात बाळ सुखरूप असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

Web Title: Delivery on hospital steps