पाचोड परिसरात डेंगीचे दोन रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

पाचोड (ता. पैठण) येथे दोन डेंगीचे, तर एक डेंगीचा संशयित रुग्ण आढळल्याने सर्वत्र शनिवारी (ता. 24) खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या दोनशे फुटांवर दोन डेंगीचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला. पाचोडसह परिसरात पावसाने पडलेल्या खड्ड्यांत साचलेल्या सांडपाण्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. डेंगीसदृश आजाराने पाचोडमध्ये डोके वर काढले आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः पाचोड (ता. पैठण) येथे दोन डेंगीचे, तर एक डेंगीचा संशयित रुग्ण आढळल्याने सर्वत्र शनिवारी (ता. 24) खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या दोनशे फुटांवर दोन डेंगीचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला. पाचोडसह परिसरात पावसाने पडलेल्या खड्ड्यांत साचलेल्या सांडपाण्यामुळे साथीचे आजार फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. डेंगीसदृश आजाराने पाचोडमध्ये डोके वर काढले आहे.

डेंगी आजाराचे पाचोड येथील हाजी शमशोद्दिन दादाभाई बागवान (वय 80), तर शाहबाज इसाक बागवान (वय 18) वर्षे हे दोन रुग्ण आढळले आहेत. वेळीच डासांची पैदास रोखली नाही तर सर्वत्र याचे डास फैलावण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. एडीस इजिप्ता या डासांपासून डेंगी आजार पसरतो. आता पाण्यातूनही पसरणाऱ्या डेंगीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. एडीस इजिप्ता हा डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतो व विषाणू पसरवतो. या डासांची उत्पत्ती ही घरातील व परिसरातील भांडी, जुने टायर, पाण्याच्या व टाकाऊ वस्तू यात साठवलेल्या पाण्यात होते. विशेष म्हणजे, डेंगीची लागण झालेल्या रुग्णास चावलेला डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्यालाही डेंगीची लागण होऊ शकते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. अनेक वर्षांपासून पाचोडसह परिसरात आरोग्य विभागाने धूर फवारणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे 2006 मध्ये परिसरात डेंगीच्या थैमानाचे स्मरण होते.

 

 

साठवलेल्या पाण्याचे ड्रम, रांजण, पाण्याच्या टाक्‍या आठ दिवसाला धुवाव्यात. घरासमोर आजूबाजूला डबकी होऊ देऊ नयेत. जुने टायर, अडगळीच्या ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवावा व होणारा डेंगी टाळावा.
- डॉ. शिवाजी भोजने.

 

पाचोड परिसरामध्ये डेंगीचे दोन रुग्ण आढळले आहेत, तर तिसरा रुग्ण संशयित असून याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून त्वरित कारवाई करून फवारणी करावी. परिसरातील डेंगीचा प्रादुर्भाव वाढू देऊ नये, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एक-दोन दिवसांत पाचोडसह परिसरात धूर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- विलास भुमरे, अर्थ व बांधकाम सभापती, औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue claimed two patients lives