औरंगाबादमध्ये डेंगीचा प्रकोप, अकरा बळीनंतर महापालिका गंभीर

माधव इतबारे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

 • नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक मोहीम 
 • कोरडा दिवस दररोज पाळला जाणार

औरंगाबाद - डेंगीचा शहरात प्रकोप सुरुच असून, तब्बल 11 जणांचे बळी घेतल्यानंतर महापालिकेने आता डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. धूर फवारणी, औषध फवारणी, ऍबेट ट्रीटमेंट, कोरडा दिवस दररोज पाळला जाणार आहे. 

पावसाळ्यात साथरोगासोबच डेंगीच्या तापाने कहर केला. तो अडीच महिन्यानंतरही सुरूच आहे. बळींची संख्या तब्बल 11 पर्यंत पोचली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या उपाययोजनानंतरही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (ता. 16) पुन्हा एकदा आढावा घेतला.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, हिवताप विभागाचे सहसंचालक डॉ. विनायक भटकर, घाटीचे डॉ. शेख सर्फराज, डॉ. पवन डोंगरे, महापालिकेच्या डॉ. राणे, डॉ. कराड, डॉ. प्रेरणा वडेरा यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यात डेंगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात असलेल्या 15 पेक्षा अधिक चॅरिटेबल ट्रस्टची रुग्णालये असली तरी या रुग्णालयांचे सहकार्य मिळत नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

त्यामुळे धर्मदाय आयुक्तांना पत्र पाठवून या रुग्णालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन घाटी रुग्णालयात स्वतंत्र महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चिकलठाणा येथील मिनी घाटीतही स्वतंत्र कक्ष उघडण्यात येणार आहे. सुटीच्या दिवशीही महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर डॉक्‍टरांनी वेळ देवून रुग्णांवर औषधोपचार करावेत अशी सूचना महापौरांनी केली. 
 
विद्यार्थ्यांची घेणार मदत 
शहरातील सर्व होमिओपॅथिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, फार्मसीचे विद्यार्थी, एमएसडब्ल्यूचे विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शासनाच्या मलेरिया, हिवताप विभागाचे तब्बल 65 कर्मचारी महापालिकेकडे काम करतात, मात्र ते रुग्णालयामध्ये. त्यांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे. महापालिकेकडून ज्या वसाहतीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, त्याच्या एक दिवस अगोदर कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

अॅबेटसाठी तीन लाखांची मदत 
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तातडीने ऍबेट खरेदीसाठी डीपीडीसीमधून तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे ऍबेट औषधी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दोन महिन्यांपासून शहरात ऍबेटींग मोहीम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेकडील ऍबेट संपली आहे. तसेच
घरोघरी जाऊन पाण्याच्या साठ्यात ऍबेट औषधी टाकण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

डेंगीची लक्षणे 

 • अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप येणे 
 • डोके, हातापायात प्रचंड वेदना होणे 
 • अशक्तपणा येणे, भूक न लागणे
 • मळमणे कोणत्याच पदार्थाची चव न येणे 
 • गळा दुखणे, गळ्यात काटा टोचल्यासारखे वाटते 
 • सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना होणे 

 
अशी घ्या काळजी 

 • आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळा 
 • जादा काळ पाणीसाठा होऊ देऊ नका 
 • घराजवळील डबकी बुजवावीत 
 • आपला परिसर स्वच्छ ठेवा 
 • शरीरावर पूर्ण कपडे वापरावेत 
 • मच्छरदाणीचा वापर करावा 
 • जुने टायर, भंगार साहित्य नष्ट करा
 • ताप आल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जा 

हे वाचा : Video : अंधारून येताच सरोवरावरून उडतात राक्षसी जीव 

हे वाचले का? : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात...

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Havoc Continues, Eleven People Dead at Aurangabad