डेंग्यू फुल; रुग्णालये हाऊसफुल तरीही लातूर पालिका कुल कुल!

latur palika
latur palika

लातूर: गेल्या दोन महिन्यापासून पावसाने जशी ओढ दिली तशी लातूरमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली. सध्या शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालये डेंग्यू आणि तापीच्या आजाराच्या रुग्णांनी हाऊसफुल झाली आहेत. सध्या शहरात विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूची लागणही विद्यार्थ्यांमध्ये अधिक पाहायला मिळते आहे. तरीही शहरात साथीच्या पातळीपर्यंत डेंग्यूचे प्रमाण पोचले तरी महापालिकेकडून खासगी क्लास, शाळा, सार्वजनिक ठिकाणी फवारणी होताना दिसत नाही.

एका नामांकीत डॉक्टरची नातेवाईक दहावीत शिकणारी कमलाक्षी राजकुमार माने (नाव बदलले आहे) ही जेव्हा तापीने फणफणली तेव्हा शहरातील किमान सहा रुग्णालयात विचारणा केल्यानंतर एका ठिकाणी रुग्ण दाखल करण्यासाठी जागा असल्याचे कळले. खुद्द डॉक्टरांनाच असा अनुभव येत असेल तर सामान्यांचे सर्वच अवघड. रमा थिएटरजवळ एका नामांकीत चार मजली  बालरुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी जागाच शिल्लक नाही. मोकळी जागा दिसेल तिथे कॉट भाड्याने आणून रुग्णांची व्यवस्था केली. तरीही रुग्णांचा वाढता ओघ लक्षात घेऊन तेथील डॉक्टरांना शेजारच्या इमारतीत रुग्णांची व्यवस्था करावी लागली. तर सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यविभागातील रुग्णांची संख्या अडीचशेवरून चारशेपर्यंत वाढली आहे. शाळा आणि खासगी क्लासमध्येच लागण वाढल्यामुळे रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. शहराच्या सिग्नल कँम्प भागात एका  खासगी क्लासचा संपूर्ण वर्गच शिक्षिकेसह तापीने फणफणलेला आहे.  

रक्तपेढ्यांमध्ये तुटवडा बदलते हवामान, वाढलेले तापमान आणि डासांच्या वाढत्या प्रमाणामुळेच सध्या तापीचे रुग्ण अधिक वाढले आहेत. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. डेंग्यूमुळे जीव गेल्याच्या घटना नसल्यातरी ताप आणि इतर लक्षणांचे रुप बदलत असून डेंग्यूच्या विषाणूमुळे मेंदूज्वर होऊन रुग्ण बेशुद्ध झाल्याच्या एक-दोन घटना आहेत. त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घ्यावी, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्रजित लकडे यांनी दिली. तर सध्या शहरात रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठी कमी झाला आहे.  

घटलेल्या पांढऱया पेशी वाढविण्यासाठी डेंग्यूच्या रुग्णांना रक्तपेढीची मदत घ्यावी लागते. मात्र शहरातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये तीव्र तुटवडा जाणवतो आहे, अशी माहिती माऊली रक्तपेढीचे डॉ. शार्दुल शिंदे यांनी दिली. लक्षणांवर अशी घ्या काळजी-

डेंग्यूच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर चार ते सहा दिवसानंतर आजाराची लक्षणे दिसू लागतात. ताप (103 ते 105 फॅ.), डोकेदुखी, डोळ्यामागे सतत दुखत राहणे, सांधेदुखी, अंगदुखी, थोड्याप्रमाणात पुरळ आणि कधी तरी नाकातून रक्त येणे अशा कमीजास्त प्रमाणात लक्षणे रुग्णांमध्ये दिसू लागतात. तापीच्या रुग्णांनी द्रवरुप आहार अधिक घ्यावा, आराम करावा आणि अशी लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना अंगभरून कपडे घालावेत. घरार आणि भोवती डास होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशी माहिती डॉ. मनोज शिरुरे यांनी दिली.  

नागरिकांनीच पुढे येण्याची गरज
डेंग्यूची लागण झालेला रुग्णच त्याचा मोठा प्रसारक असतो. चांगल्या पाण्यात वाढणारे आणि दिवसा चावणाऱया एडीस मादी  डासामुळेच डेंग्यू होतो. लागण झालेल्या व्यक्तीला हे डास चावून तो ज्या व्यक्तीला चावते, तेथे या विषाणूची लागण होते. म्हणून नागरिकांनीच पुढाकार घेऊन घर, आंगण आणि गल्ली स्वच्छ ठेवली पाहिजे. पाणीसाठे काढून टाकले पाहिजेत. शाळा-  महाविद्यालयांमध्ये फवारणी करावी, तरच शहरातील डेंग्यूची लागण नियत्रित होऊ शकते, असे मत संजय कांबळे यांनी व्यक्त केले.  

महापालिका कुलच!
खासगी रुग्णालयात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती डॉक्टर पालिकेला देतात. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी त्या रुग्णाचे रक्तनमुने शासकीय प्रयोगशाळेतच तपासल्यानंतच त्या अहवालावर डेंग्यूचा रुग्ण मान्य करतात. या प्रक्रियेला सहा दिवसापेक्षा अधिक काळ लागतो. तोपर्यंत रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असतो. रुग्ण आहे की नाही, हे ठरविण्यासाठीच सहा दिवस त्यावर शहरात उपाय करण्याचे तर दूरच. एवढेच नाही तर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांचा दूरध्वनी कधीच लागत नाही, आणि ते त्यांच्या जागेवरही सापडत नाहीत. त्यांच्या मोबाईलवर मेसेजही पाठवला तरी ते उत्तर देण्याची तसदी घेत नाहीत. तर गेल्या आठवड्यात पालिका आयुक्तांनीच पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या बँक खात्यात केवळ 56 हजार रुपये असल्याचे हताशपणे सांगितले होते. इतरवेळी 'विकास कामां'साठी हिरहिरीने भांडणारे नगरसेवकही शहराच्या आरोग्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com