लातूर शहरात डेंगीचा धोका वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

अशी घ्या दक्षता

  • घरातील किंवा परिसरातील एकही पाणीसाठा उघडा राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. हौद, बॅरल, टाक्‍या घट्ट झाकून ठेवाव्यात.
  • घरातील पाणीसाठ्याची भांडी दर आठ-दहा दिवसांनंतर रिकामी करा. घासून, पुसून कोरडी करून मगच पाणी भरून ठेवा. 
  • डासांपासून व्यक्‍तिगत सुरक्षेसाठी मच्छरदाणीचा वापर, डास प्रतिरोध क्रीमचा वापर करावा. पूर्ण कपडे वापरावेत.
  • ताप किंवा थंडी असेल तर शासकीय, मनपा रुग्णालय अथवा नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

लातूर - शहरात सध्या पाणीटंचाई असून दहा दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे घराघरांत पाण्याची साठवणूक होत आहे; पण ती अयोग्य पद्धतीने होत असल्याने शहरातील काही भागांत एडिस इजिप्तीस डासाची पैदास होत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कीटकशास्त्रीय सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, असे खुद्द महापालिकेनेच बुधवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात डेंगीचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

डेंगीच्या डासाची पैदास ही साठलेल्या स्वच्छ पाण्यात होत असते. पाण्यामध्ये आढळून येणारी अळी म्हणजे डासाची पूर्णावस्था असते. त्यापासूनच एका आठवड्याच्या आत डास तयार होतो. डेंगीच्या डासाच्या अंगावर व पायावर पांढरे पट्टे असल्यामुळे या डासास टायगर मस्किटो असेही म्हणतात. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो. त्यामुळे नागरिकांनी पाणीटंचाईच्या या परिस्थितीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी. असे केल्यास डेंगी आजारास नक्‍कीच आळा बसेल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

इंडिया फाईट्‌स डेंगी
डेंगीसारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी लोकशिक्षण, लोकसहभाग हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन केले जाते. आवाहन केले जाते. सरकारने आता इंडिया फाईट्‌स डेंगी या नावाने ॲप सुरू केले आहे. ते प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे. त्यावर या आजाराची सर्व माहिती आणि उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी सांगितले.

आकडेवारी
वर्ष      संशयित     रुग्ण

२०१६     १५६         ५५
२०१७      ३३          १०
२०१८     १४६         ७२
२०१९      ३९          ०६
(एप्रिलपर्यंत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Sickness Increase in Latur City Dangerous Health Care