आठ हजार कोटींच्या आराखड्यास आज मान्यता? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - "ऑरिकच्या एकूण आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे सहाशे कोटी रुपयांचा पहिला टप्पा आपल्याला मिळाला आहे. आठ हजार कोटींच्या सुधारित आराखड्यास उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळू शकेल,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. 

औरंगाबाद - "ऑरिकच्या एकूण आठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारतर्फे सहाशे कोटी रुपयांचा पहिला टप्पा आपल्याला मिळाला आहे. आठ हजार कोटींच्या सुधारित आराखड्यास उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळू शकेल,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. 

मुख्यमंत्री म्हणाले, "देशातील सर्वांत पहिली आधुनिक औद्योगिक स्मार्ट सिटी ही "ऑरिक' या नावाने आपण तयार करत आहोत. जवळजवळ 70 हजार कोटींची गुंतवणूक येथे टप्प्याटप्प्याने होईल, असे अपेक्षित आहे. त्यातून तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. पहिल्या टप्प्यातील शेंद्रा नोडचे काम ऑक्‍टोबर 2018 पर्यंत पूर्ण केले जाईल. बिडकीनचा नोड 2017 मध्ये सुरू केला जाईल. 2020, 2021 आणि 2022 अशा तीन टप्प्यांत तो पूर्ण होईल. ही औद्योगिक सिटी माहिती, तंत्रज्ञान व संवाद आधारित (आयसीटी बेस्ड) असेल. ऑरिक हॉल हे या शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय असेल. संपूर्ण शहर हे एका कमांड सेंटरद्वारे चालविले जाईल. सर्व सुविधा त्या माध्यमातून पुरविल्या जातील. संपूर्ण शहरात फायबर नेटवर्क असणार असल्याने हे शहर वायफाययुक्त असेल.' 

"दुष्काळात उद्योगांचे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागेल का? अशी भीती उद्योगांमध्ये होती. याच कारणास्तव ऑरिकमध्ये निम्मे पाणी हे पुनर्प्रक्रिया केलेले असेल. औरंगाबाद शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते येथे वापरले जाईल. याशिवाय या परिसरातील काही पाझर तलाव आणि पाणीसाठ्यांचे योग्य संवर्धन करून तेही वापरले जाईल. या शहराला तीन दिवस पाणीपुरवठा पुरेल इतक्‍या क्षमतेची पाणीटाकी येथे तयार केली जात आहे. शेंद्रा आणि बिडकीन यांना जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हे एकात्मिक औद्योगिक शहर भासेल' असे ते म्हणाले. 

भूखंड वाटपाची प्रक्रिया 28 पासून 

एक महत्त्वाची घोषणा आणखी करायची आहे. या ऑरिक प्रकल्पांतर्गत शंभर एकर क्षेत्र वाटपाची प्रक्रिया आम्ही 28 नोव्हेंबरपासून सुरू करत आहोत. ऑनलाइन प्रक्रिया असेल. यातील 20 टक्के क्षेत्र (20 एकर) हे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांकरिता राखीव ठेवले आहे. सोबतच दहा एकर क्षेत्रावर आम्ही काही गाळे निर्माण करत आहोत. हे सगळे गाळे उद्योगांना दिले जातील. विशेषतः हे सगळे लघु उद्योगांकरिता ठेवण्यात आले आहेत. लघु उद्योजकांची इको-सिस्टीम या माध्यमातून तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

ऑरिक हॉलचे भूमिपूजन 

शेंद्रा औद्योगिक पार्कमधील औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडतर्फे ऑरिक हॉल नावाने अडीच लाख चौरस फूट क्षेत्रावर प्रशासकीय इमारत उभारली जात आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Web Title: Design approval for this eight thousand crore