देवगावला आगीत घर, दुकान खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सुमारे पस्तीस लाखांचे नुकसान, संसारोपयोगी वस्तू खाक

सुमारे पस्तीस लाखांचे नुकसान, संसारोपयोगी वस्तू खाक

देवगाव रंगारी :  देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील बसस्थानक परिसरातील घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरातील संसारोपयोगी सामान व दुकानातील वस्तूंची राखरांगोळी झाली. या घटनेत साहित्य, रोख रक्कम, दागिने असे अंदाजे 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना मंगळवारी (ता. 29) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
बसस्थानक परिसरात येथील पुंडलिक तुकाराम सोनवणे यांचे विजया इलेक्‍ट्रिकल्स व हार्डवेअर दुकान असून, मागेच घरही आहे. सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी पहाटे त्यांचा मुलगा गणेशला जाग आली असता त्यास सामान जळत असल्याचे लक्षात आले. दुकानातील प्लास्टिक व रबरी सामान तिथे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. बघताबघता आगीचे लोळ घराकडे यायला लागले.

गणेशने प्रसंगावधान राखून तरुणांच्या मदतीने आई, वडील व आजीला घराबाहेर काढले. शेजारी असलेले शेखर सुरासे, अनिल सोनवणे, राहुल बोरसे, ललित सुरासे, अशोक कदम, सर्फराज शेख, सुभाष सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे, राजू डुमणे, अमर सुरासे, धीरज ठोळे, सुनील गवळी यांनी मदत केली. सहायक पोलिस निरीक्षक राजश्री आडे याही घटनास्थळी पोहोचल्या. सर्वांनी मिळेल त्या घरातून पाणी आणून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. खासगी टॅंकरचालक कालू शेख, सिकंदर शेख तसेच गुळचंद राजपूत यांनी टॅंकरने पाणी आणले. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग इतकी भयानक होती, ती आटोक्‍यात आणायला तीन तास लागले.

तोपर्यंत दुकानातील सामान, संसारपयोगी वस्तू, दागिने, कपडे व घरातील नगदी पैसे असे सुमारे पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. पुंडलिक सोनवणे यांच्या कुटुंबाच्या अंगावरील कपडे फक्त वाचले आहेत.तलाठी गणेश मोहिते व पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनर्थ टळला
स्वयंपाकघरात दोन गॅंसच्या टाक्‍या होत्या. घराने पेट घेतल्याने मदत करणाऱ्या तरुणांना आत जाता येत नव्हते. गॅंस सिलिंडर पेट घेणार तेवढ्यात अग्निशामक दलाचे जवान हजर झाले. त्यांनी तत्काळ प्रथम सिलिंडर बाहेर आणले व पुढील अनर्थ टळला.

Web Title: Devagavala fire house, shop consumed