'बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची गरज '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

अहमदपूर - बलशाली व एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व धर्म व संप्रदायांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

अहमदपूर - बलशाली व एकसंघ राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व धर्म व संप्रदायांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

भक्तिस्थळ येथे बुधवारी (ता. एक) राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार सुनील गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, माजी आमदार मनोहर पटवारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक गंगाधर पवार, विभाग संघचालक व्यंकटसिंह चव्हाण, विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. अशोक कुकडे यांची उपस्थिती होती. 

सरसंघचालक भागवत म्हणाले, की देशातील विविध धर्म व संप्रदाय यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत. परंतू या सर्वांचे सार व तत्त्वज्ञान एकच असल्याचे पहावयास मिळते. आत्मसाधना व परोपकाराच्या माध्यमातून देशाची प्रगतीच झाली पाहिजे, हीच धारणा प्रत्येक धर्म व संप्रदायाची असते. याशिवाय आपल्या विकासात इतरांचाही विकास झाला पाहिजे, ही आपली संस्कृती आहे, त्याची आपण जपणूक करणे गरजेचे आहे. 

यावेळी बोलताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, की आपण स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. चारित्र्य संपन्नतेचे धडे संघाच्या शाखेत दिले जातात, त्यामुळे चारित्र्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी संघाचा मार्ग अनुसरला पाहिजे. या शिवाय स्वातंत्र्याच्या सत्तरीतही आपण अजूनही बौद्धिक गुलामगिरीत वावरतो आहोत ही खेदाची बाब आहे. देशातील सगळे संप्रदाय एकत्र येऊन हिंदू धर्म वाढविला तरच देश मोठा होऊ शकतो, अशीही टिप्पणी त्यांनी केली. राष्ट्रसंत डॉ. शिवाचार्य महाराज यांचा जीवन परिचय प्रा. उमाकांत होनराव यांनी करून दिला. सूत्रसंचालन विजय सिद्धेवार यांनी केले तर आभार प्रा. रविशंकर इरफळे यांनी मानले. 

कार्यक्रमास भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बाजार समितीचे सभापती ऍड. भारत चामे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख, सरपंच शिवाजीराव भिकाणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून तसेच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांतून भाविक आले होते. 

Web Title: To develop a strong nation needs unity to work