शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवणार - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

अंबाजोगाई (जि. बीड) - 'राज्यात गेल्या 67 वर्षांत केवळ पाच हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे केवळ चार वर्षांत राज्यात वीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळाली असून कामे प्रगतिपथावर आहेत,'' असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विकासाची अन्य अनेक कामे सुरू असून, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयातर्फे हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेजमधील 6042 कोटी रुपयांच्या जिल्ह्यातून जाणाऱ्या तेरा राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे एकत्रित भूमिपूजन अंबा सहकारी साखर कारखाना येथे झाले. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संगणकाची कळ दाबून भूमिपूजन झाल्याचे जाहीर केले.

जलसंधारणातही लक्ष घालणार - गडकरी
'आपल्या विभागाकडून राज्यात कोट्यवधींची कामे होत आहेत. आगामी काळात जलसंधारणाच्या कामांतही लक्ष घालणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार आहे,'' असे नितीन गडकरी म्हणाले. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी नदीवरील अपूर्ण प्रकल्पांची कामे मार्गी लागतील. शेतकऱ्यांनी केवळ ऊस, मका, तूर, गहू आदी पारंपरिक पिके घेऊन भागणार नाही, तर इंधन, वीजनिर्मितीही करावी. इथेनॉलपासून बायोप्लॅस्टिक तयार करावे. त्यातून ऊस उत्पादकांना दिलासा भेटेल. शेती उत्पादनाच्या किंमती जागतिक बाजारपेठेत ठरत असल्याने पऱ्हाट्या, तुराट्यापासून इथेनॉल तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: development devendra fadnavis politics