पायाभूत सुविधांमुळे मिळेल विकासाला चालना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पायाभूत सुविधांपासून वंचित असलेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. पण, अलीकडे नगर - बीड - परळी या लोहमार्गासह धुळे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने ही ओळख पुसण्याची शक्‍यता आहे. कामाचा वेग वाढला तर दळणवळण वाढेल व विकासाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी राज्य व राष्ट्रीय महामार्गापेक्षा जास्त असली तरी याचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतून ही कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावत असला तरी अनेक माध्यमिक शाळांना इमारती नाहीत.

पायाभूत सुविधांपासून वंचित असलेला जिल्हा अशीच बीडची ओळख होती. पण, अलीकडे नगर - बीड - परळी या लोहमार्गासह धुळे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने ही ओळख पुसण्याची शक्‍यता आहे. कामाचा वेग वाढला तर दळणवळण वाढेल व विकासाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी राज्य व राष्ट्रीय महामार्गापेक्षा जास्त असली तरी याचे नियंत्रण जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांतून ही कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावत असला तरी अनेक माध्यमिक शाळांना इमारती नाहीत. अनेक शाळा पडक्‍या किंवा कालबाह्य इमारतींमध्ये भरत आहेत. त्याच्या बांधकामांसाठी निधीची गरज आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोचविण्यासाठी गावोगाव उपकेंद्रांची उभारणी गरजेची आहे. जिल्ह्यातून नव्याने परतूर - पंढरपूर व शिर्डी - औंढा हे दोन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहेत. या कामांची प्रत्यक्ष सुरवात गतीने झाली तर विकासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांची सद्यःस्थितीत 
नगर - बीड - परळी लोहमार्गाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली.
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू.
जागोजागी वीज केंद्रांची उभारणी.
आरोग्य केंद्र व उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह इतर आरोग्य संस्थांसाठी इमारतींची उभारणी
नवीन बसस्थानकांची उभारणी
पालिका, तहसील, पंचायत समित्यांसाठी नव्या इमारतींची उभारणी  

अपेक्षा
नगर - बीड - परळी लोहमार्ग व धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग वाढला पाहिजे.
ग्रामीण भागात बॅंकांचे जाळे वाढले पाहिजे.
कॅशलेस व्यवहारासाठी यंत्रणा वाढली पाहिजे.
नव्याने प्रस्तावित झालेले व जिल्ह्यातून गेलेल्या शिर्डी-औंढा व परतूर-पंढरपूर  या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना सुरवात करावी. 
ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवाव्यात.
पडझड झालेल्या, मुदतबाह्य झालेल्या व इमारती नसलेल्या शाळांना नवीन इमारतींसाठी निधी द्यावा.
ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी करावी. 
आरोग्य विभागासाठी अद्यायवत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. 

तज्ज्ञ म्हणतात
खेडेगाव ते देशाचा विकास हा तेथील उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. राज्याच्या प्रगतीमध्ये दळणवळण हा मुख्य घटक आहे. आजही महाराष्ट्रात दळणवळणासाठी चांगले रस्ते नाहीत. राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रगती करायची असेल तर, अत्यंत कार्यक्षम अशी दळणवळणाची यंत्रणा असली पाहिजे. ही यंत्रणा म्हणजे गाव, वस्ती, शहर यांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, जल मार्ग, विमान सेवा असायला पाहिजे. तसेच याचा वापर करू शकणारी माल, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन व्यवस्थेचे जाळे उभारले, तर निश्‍चितच विकास होईल.
नीलकंठ भोसले

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल; परंतु आजही खेडेगावात पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. राज्याच्या प्रगतीमध्ये विद्युत ऊर्जेला अनन्यसाधारण महत्त्व असताना आजही ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. भारनियमन, शाश्‍वत वीज न मिळणे, ग्राहकांच्या वीजबिलात होणारी गफलत अशा अनेक समस्या आहेत. भारनियमनामुळे शेतमालाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर, राज्य सरकारने ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी व्हायलाच हवे.
प्रताप लाटे

राज्याच्या विकासामध्ये पाणी, रस्ते, वीज यासह इंटरनेट महत्त्वाचा घटक झाला आहे. केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. परंतु यासाठी आवश्‍यक असलेली इंटरनेट सुविधा आजही दुर्गम भागापर्यंत पोहोचलेली नाही. देशातील शहर, महानगरात असलेली इंटरनेटचा स्पीड इतर देशांच्या तुलनेत फार कमी आहे. आजही इंटरनेट सेवा खोळंबल्यामुळे ग्रामीण भागात दिवसदिवस बॅंकांचे व्यवहार बंद असतात. आधुनिक प्रगती, कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेटची स्पीड वाढविण्यासाठी आवश्‍यक बदल करणे गरजेचे आहे.
राजाभाऊ शेळके

विद्यार्थ्यांना शाळेबद्दल गोडी निर्माण होण्यासाठी पायाभूत सुविधा असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये शाळेची इमारत, मैदान, स्वच्छतागृह, रॅम्प, सौरक्षण भिंत या भौतिक सुविधांबरोबरच प्रत्येक वर्गासाठी विषयनिहाय शैक्षणिक साहित्य असणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक साहित्यात मुले रमतात. पुरेसे शिक्षक व पालकांचा शाळेत सहभाग हाही महत्त्वाचा आहे. 
बापूसाहेब तारूकर

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजही रस्ते, वीज, शिक्षण, कृषी या क्षेत्रात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. सोशल मीडियावर एकीकडे जवळ आलो असलो तरिही ग्रामीण भागातील रस्त्याचा मोठ्या प्रश्‍न कायम आहे. दळणवळणासाठी चांगले रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
 दत्ता जाधव

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही पायाभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. आजही  रस्ते, वीज, शिक्षण  या क्षेत्रात ग्रामीण भाग पिछाडीवरच आहे. एकीकडे आपण कॅशलेश व्यवहार करावा म्हणून ग्रामीण भागातील जनतेला सांगत आहोत; परंतु ते आता शेतकऱ्यांना समजणारे वाटत नाही. दळणवळणासाठी चांगले रस्तेसुद्धा नसल्याने नागरिकांचे हाल होतात. पायाभूत सुविधांअभावी क्रीडा क्षेत्रात जिद्द असून विद्यार्थ्यांना घडवता येत नाही.
प्रा. सतीश बणे

Web Title: development of infrastructure