सोन्याच्या ताटात जेवणाऱ्यांना शेतकरी व्यथांचे काय? - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

येणेगूर (ता. उमरगा) येथे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोनेरी ताटात जेवण घेतल्याचा धागा पकडून फडणवीस म्हणाले, ""गरीब जनतेच्या बळावर कॉंग्रेसजनांनी अनेक वर्षे सत्ता भोगली. मात्र, त्यांच्यासाठी भरीव काम केले नाही. सोन्याच्या ताटात जेवण करणाऱ्यांना शेतकरी, गरिबांच्या व्यथा काय कळणार?'' 

उमरगा - कॉंग्रेसने प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगूनही सर्वांगीण विकास साध्य केला नाही. भाजपने मात्र दोन वर्षांच्या काळात मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासह विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली. आता सर्वांगीण प्रगतीचा आराखडा तयार केला असून, सरकार येत्या तीन वर्षांत त्याची प्रभावी अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. सोन्याच्या ताटात जेवणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय कळणार, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी तुरोरी (ता. उमरगा) येथे आज सकाळी झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. माजी खासदार रूपाताई पाटील-निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्येष्ठ नेते शिवाजी चालुक्‍य आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ""शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा तिजोरी रिकामी होती, त्यातच दुष्काळाचे आव्हान उभे राहिले. त्या वेळी निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना थेट आठ हजार कोटी रुपयांची मदत केली. विविध योजनांच्या माध्यमातून तेरा हजार कोटी दिले.

अन्नसुरक्षा योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आघाडी सरकारने जलसिंचनासाठी योग्य उपाययोजना केल्या नाहीत. आमच्या सरकारने लोकसहभागातून जलयुक्‍त शिवार योजना हाती घेतली. त्यातून चार हजार गावे दुष्काळमुक्‍त केली. आगामी काळात शेतीसाठी दिवसाही वीज उपलब्ध करून दिली जाईल.'' नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीविकासातून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे, त्यासाठी जागतिक बॅंकेकडून पाच हजार कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वांना घर, शिक्षणाचे सार्वत्रीकरण, ग्रामीण विकासासाठी अनेक योजना प्रस्तावित असून, भाजपला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

येणेगूर (ता. उमरगा) येथे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोनेरी ताटात जेवण घेतल्याचा धागा पकडून फडणवीस म्हणाले, ""गरीब जनतेच्या बळावर कॉंग्रेसजनांनी अनेक वर्षे सत्ता भोगली. मात्र, त्यांच्यासाठी भरीव काम केले नाही. सोन्याच्या ताटात जेवण करणाऱ्यांना शेतकरी, गरिबांच्या व्यथा काय कळणार?'' 

Web Title: Devendra Fadnavis criticize congress