मराठवाडा आम्ही सुजलाम सुफलाम बनवू: देवेंद्र फडणवीस

सुशांत सांगवे
रविवार, 1 एप्रिल 2018

...असे आमच्या सरकारकडून होणार नाही
मंजूरी मिळाल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत भूमिपूजन झालेला रेल्वेचा हा पहिलाच कारखाना आहे. इतक्या कमी वेळात भूमिपूजन अन्य कोठेही झाले नाही. तातडीने पावले उचलणे, हे मोदी सरकारचे धोरणच आहे. जर पावले उचलली नाहीत, तर मोदीजी स्वत: अधिकाऱ्यांना कामाला लावतात, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘‘आजवर मराठवाड्यात अनेक भूमिपूजन झाले. पण त्यानंतर त्या जागेत काहीही घडले नाही. असे आमच्या सरकारकडून होणार नाही. ज्या दिवशी गोटा लागला त्याच्या पुढच्या काही दिवसात प्रोजेक्ट पूर्ण होतो म्हणजे होतोच.’’

लातूर : ‘‘तुमचे दु:ख आणि आमचे दु:ख, तुमची भूक आणि आमची भूक एकसारखीच आहे. आपल्या दोघांना विकास हवा आहे. रिकाम्या हातांना काम हवं आहे. पाणी हवं आहे. आपली लढाई विकासाची आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाला प्रथम प्राधान्य, हा आमच्या सरकारचा अजेंडा आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करून या भागाला आम्ही सुजलाम सुफलाम बनवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तुम्ही लातूरचा परीक्षेचा पॅटर्न तयार केला. मी तुम्हाला शब्द देतो, लातूरच्या विकासाचा नविन पॅटर्न विकसित करून तो मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतो, असेही ते म्हणाले.

मराठावाडा रेल्वे कोच कारखान्याचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर त्यांनी लातूरकरांशी मुक्तसंवाद साधला. या वेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘आमच्या सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या आम्ही मराठवाडा आणि विदर्भातच सुरू करणार आहोत. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प तयार झाला तर इथे दुष्काळ राहणार नाही. पाण्याची दुर्भिक्ष राहणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा थांबतील. सध्या इथले पळवून नेले जाणारे पाणी आम्ही परत आणले आहे. जलशिवार’सारखी कामे झाली आहेत. त्यामुळे या भागात अद्याप टँकर सुरू झाले नाहीत, याचा विशेष आनंद आहे. पाणी नसल्यामुळे इथे उद्योग येत नव्हते; पण हे चित्र आता बदलायला सुरवात झाली आहे. समृद्धी महामार्ग आणि त्याच्याशी निगडित कनेक्टिव्हीटी तयार झाल्यानंतर इथल्या उद्योगाचेही चित्र बदलेल.’’

...असे आमच्या सरकारकडून होणार नाही
मंजूरी मिळाल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत भूमिपूजन झालेला रेल्वेचा हा पहिलाच कारखाना आहे. इतक्या कमी वेळात भूमिपूजन अन्य कोठेही झाले नाही. तातडीने पावले उचलणे, हे मोदी सरकारचे धोरणच आहे. जर पावले उचलली नाहीत, तर मोदीजी स्वत: अधिकाऱ्यांना कामाला लावतात, असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘‘आजवर मराठवाड्यात अनेक भूमिपूजन झाले. पण त्यानंतर त्या जागेत काहीही घडले नाही. असे आमच्या सरकारकडून होणार नाही. ज्या दिवशी गोटा लागला त्याच्या पुढच्या काही दिवसात प्रोजेक्ट पूर्ण होतो म्हणजे होतोच.’’

Web Title: Devendra Fadnavis talked about Marathwada development