मजूर कारखान्यावर आणि भाविक वृंदावनला अडकले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 March 2020

परळी वैजनाथ येथील काही भाविक वृंदावनमध्ये अडकले आहेत. त्यांच्याजवळ असणारे खाण्यापिण्याचे साहित्यही संपले असल्याने उपासमार होत आहे.

बीड - ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातील मजूर बाहेरजिल्ह्यांत आणि परराज्यांत कारखान्यांवर अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना येण्यास अडचणी येत आहेत. तर परळीतील भाविकही वृंदावनला अडकले आहेत. 

परळी वैजनाथ येथील काही भाविक वृंदावनमध्ये अडकले आहेत. त्यांच्याजवळ असणारे खाण्यापिण्याचे साहित्यही संपले असल्याने उपासमार होत आहे. एक महिन्यापूर्वी शहरातील ८० भाविक उत्तरप्रदेशातील वृंदावनमध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. हा धार्मिक कार्यक्रम आटोपून ते परत येणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेल्वे, बससेवा बंद करण्यात आल्याने हे सर्व भाविक वृंदावन येथेच अडकले आहेत. यातील ८० भक्त हे शहरातील असून १० भक्त पंढरपूर येथील आहेत. या सर्व भक्तमंडळींजवळ असलेले अन्नधान्य, पैसाअडका संपल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली. 

ऊसतोड मजूरही अडकले 
डोंगरकिन्ही : बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणीसाठी बाहेरजिल्ह्यांत आणि परराज्यांत स्थलांतर झालेले मजूर त्याच भागात अडकले आहेत. 
कोरोनाच्या साथीत या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार कारखाने बंद असल्याने गावाकडे परतले. मात्र, ऊसतोड कामगार अद्याप कारखान्यांकडे ऊसतोड करीत आहेत. शासनाने फक्त औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साखर कारखाने मात्र जोमात सुरू आहेत.

कारखान्यांचा मोसम शेवटच्या टप्प्यात असल्याने ज्या ऊसतोड मजुरांना गावाकडे परतावयाचे आहे. त्यांनाही परवानगी दिली जात नाही. काही कारखाने मागील चार-पाच दिवसांत बंद झाले आहेत. मात्र संचारबंदी असल्याने व सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केलेल्या असल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी वाहने मिळेनाशी झाली आहेत. आमच्या टोळीतील पिंपळवंडी येथील सहा मजूर व वीस जनावरे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अडकले आहेत. संचारबंदीमुळे त्यांना गावाकडे आणता येईना. मूळचे नंदुरबारचे असलेल्या काही मजुरांना संचारबंदीपूर्वी डोंगरकिन्हीला आणले आहे. त्यांना नंदुरबारला नेऊन सोडता येईना, असे मुकादम नानासाहेब भोगले म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees got stuck in Vrindavan