शनैश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी 

राजेश गरुड
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

जैनपूर कोठारा ( ता:भोकरदन) :  सकाळपासून लागल्या रांगा 

हसनाबाद (जि.जालना) -  भोकरदन तालुक्‍यातील जैनपूर कोठारा येथील पुर्णा नदीपात्रातील श्री. शनैश्‍वर मंदिरात शनिवारी (ता.27) भाविकांची मांदियाळी जमली होती.

शनिअमावस्येनिमित्त मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. 
जैनपूर कोठाळा येथील पुर्णा नदीपात्रातील श्री शनैश्‍वर देवस्थान पुरातन मानले जाते. येथे छोटेखानी मंदिर पुर्वी पात्रात असल्याने पाण्याखाली जात होते. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनास जाणे शक्‍य होत नसले. त्यामुळे काही वर्षांपुर्वी ग्रामस्थांनी एकत्र येत या मंदिराचा वर्ष 2014 मध्ये जिर्णोद्धार केला. त्यानंतर भव्य असे मंदिर बांधले. शनिशिंगणापूरप्रमाणे येथील मंदिर हे खुल्या स्वरूपातील आहे हे विशेष. पावसाळ्यात नदीपात्रात पाणी येताच परिसराचे सौंदर्यच खुलून जाते. नदीपात्रातील हे शनैश्‍वर देवस्थान लक्ष वेधून घेते.

दरम्यान, शनिवारी येथे शनिअमावस्येनिमित्त पहाटे गावात शनेश्‍वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. त्यानंतर तुकाराम महाराज जेहूरकर यांचे कीर्तन झाले. महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. मंदिर परिसरातील कार्यक्रमांसाठी बबनराव दांडगे, दत्तू सोनवणे, डॉ.कोठाळे, रामेश्वर मुंडलिक, गणेश जोशी, गणेश सुरडकर व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 
............... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees in Jainpur kothara

टॅग्स