जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

-उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशव तायडे 
-शिवसेना-कॉंग्रेस युतीच्या उमेदवारांना 34, तर भाजपच्या उमेदवारांना 28 मते 
-भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइं (डी) आले एकत्र

औरंगाबाद - पंचायत समितीप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले असून, अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशव तायडे हे विजयी झाले. दोघांना प्रत्येकी 34 मते पडली, तर भाजपच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, उपाध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश सोनावणे यांना प्रत्येकी 28 मते पडली. मंगळवारी (ता. 21) जिल्हा परिषदेत मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली होती. 

जिल्हा परिषदेत कोणताही धोका होऊ नये, यासाठी अगोदरच सर्वच पक्षांनी आपल्या सदस्यांना सहलीवर पाठविले होते. सोमवारी रात्री सर्व सदस्य औरंगाबादला दाखल झाले होते. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं (डी) चे सदस्य एकत्र आले; तर शिवसेना-कॉंग्रेसचे सदस्य हे एकत्रितपणे जिल्हा परिषदेत आले. सकाळी अकरा वाजता मतदान प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची उपस्थिती होती. अध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे देवयानी डोणगावकर, तर उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे केशव तायडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदासाठी सुरेश सोनावणे यांनी अर्ज दाखल केले. दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. यामध्ये कुणीही अर्ज मागे घेतला नसल्याने हात उंचावून मतदान प्रक्रिया झाली. यात देवयानी डोणगावकर यांना शिवसेनेच्या 18, तर कॉंग्रेसच्या 16 सदस्यांचे अशी एकूण 34 मते पडली. अनुराधा चव्हाण यांना भाजपची 23, राष्ट्रवादीची 3, मनसे 1, रिपाइं (डी) यांचे 1 अशी 28 मते पडली. उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे केशव तायडे तर भाजपचे सुरेश सोनावणे यांच्यात लढत झाली. त्यांनाही अध्यक्षपदाप्रमाणेच मते पडली. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नवीन आघाडीच्या नावाने घोषणाबाजी केली. 

शिवसेना-कॉंग्रेस पक्षाचे नेते एकत्र 
सत्तेसाठी मागील काही दिवसांपासून एकत्र आलेले कॉंग्रेस-शिवसेनेचे नेते जिल्हा परिषदेत सोबतच दाखल झाले. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, कृष्णा पाटील डोणगावकर, अण्णासाहेब माने तर कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, कल्याण काळे, नामदेव पवार हे सर्वजण जिल्हा परिषदेच्या आवारात एकत्रित फिरत होते. एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे हे नेते आज गळ्यात गळे घालून एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले. 

देवयानी डोणगावकरांचे पारडे ठरले जड 
अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून चौघांची नावे चर्चेत होती. गंगापूर तालुक्‍यातून देवयानी डोणगावकर, पैठणमधून मनीषा सोलाट, कन्नडमधून शुभांगी काजे; तर वैजापूरमधून वैशाली पाटील यांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू होते. आमदार भुमरे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांना शेवटी नमते घेत देवयानी डोणगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. 

डोणगावकर घराण्याची हॅट्ट्रिक 
डोणगावकर घराण्यात तिसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद आले आहे. साहेबराव पाटील डोणगावकर हे 12 फेब्रुवारी 1979 ते 16 जून 1979 पर्यंत पाचवे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना 20 जून 1979 ते 20 फेब्रुवारी 1980 या कालावधीत सहावे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. आता त्यांची सून देवयानी डोणगावकर या जिल्हा परिषदेच्या 30 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत. 

जिल्ह्यात अनेक गावांत सध्या पाणीटंचाई जाणवत असल्याने पाणीसमस्येकडे लक्ष देणार आहे. आरोग्याचा प्रश्‍नसुद्धा गंभीर आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असल्याने ती वाढविण्यासाठी प्रयत्न करू. विकास हेच ध्येय राहील. 
-देवयानी डोणगावकर (नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष) 
 

जिल्ह्यातील रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करू. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेसाठी निधी देण्याचे आश्‍वासन केले आहे. तेव्हा चांगली कामे करता येतील. सिंचन वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न करू. 
- केशव तायडे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद उपाध्यक्ष) 

Web Title: Devyani dongaonkar zp president