बुद्धलेणीवर भीमसागर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीवर मंगळवारी (ता. ११) भीमसागर उसळला होता. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्‍खू संघाने धम्मदेसनेतून उपासक, उपासिकांना मार्गदर्शन केले. 

औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीवर मंगळवारी (ता. ११) भीमसागर उसळला होता. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्‍खू संघाने धम्मदेसनेतून उपासक, उपासिकांना मार्गदर्शन केले. 

धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी परिसरात सकाळपासून उपासकांनी गर्दी केली होती. भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. बुद्धवंदना झाल्यानंतर धम्मध्वजवंदन करण्यात आले. भिक्‍खू संघाचे महापरित्राण पठण झाले. त्यानंतर भोजनदान, पूजा वंदना झाली. दुपारी दोन वाजता शहरातील मान्यवरांना बुद्धगया येथे भगवंतांना अर्पण केलेल्या चिवर पट्ट्यांनी सन्मानित करण्यात आले. भन्ते नागसेन महाथेरो यांच्यासह भिक्‍खू संघाची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी निधी पांडेय, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दौलतराव मोरे, बाबा तायडे, रूपचंद वाघमारे, विजय मगरे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. राजाभाऊ शिरसाठ यांच्या ‘भीमा, तुझ्या जन्मामुळे’ या गीतांच्या कार्यक्रमांनी उपासकांना मंत्रमुग्ध केले. 

अन्नदान आणि पाणी
बुद्धलेणीचा संपूर्ण परिसर उपासक-उपासिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या निमित्ताने विविध पक्ष, संघटनांतर्फे खिचडी, खीरदान, अन्नदान असे उपक्रम घेण्यात आले. यामध्ये आंबेडकर फोर्सतर्फे कृष्णा बनकर यांनी मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते. भीमशक्ती संघटना, भारिप- बहुजन महासंघ, भारतीय जनता पक्ष- अनुसूचित जाती- जमाती मोर्चा, फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंटने विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बहुपर्यायी प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित केली होती. या परिसरातील उपासकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वनस्पती उद्यानापासून वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली होती. सोनेरी महलसमोरील परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

पुस्तकांच्या दालनावर गर्दी
लेणी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध व्यापाऱ्यांनी खाद्यपदार्थ, खेळणीसह विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. यात बुद्धमूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती, छायाचित्रांना मोठी मागणी होती. तसेच ठिकठिकाणी वाजणाऱ्या भीमगीतांनी वातावरण संगीतमय होऊन गेले होते. परिसरात लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या दालनात विविध पुस्तकांच्या खरेदीसाठी विशेष गर्दी दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित विविध पुस्तकांसह अन्य लेखकांचे ‘महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास’, ‘बुद्ध धम्माचे संदेशवाहक’, ‘दलित  निरंतर विषमता आणि दारिद्य्र’, ‘बौद्धधम्माचे तत्त्वज्ञान’, ‘जातक कथासंग्रह’, ‘क्रांतिकारी आदिवासी जननायक’ आदी विविध विषयांवरील, विशेषतः वैचारिक पुस्तकांना अधिक मागणी होती.

Web Title: dhammachakra anupravartak din in aurangabad

टॅग्स