बुद्धलेणीवर लोटला जनसागर

औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीच्या पायथ्याशी उपासकांनी प्रज्ञासागर धम्म संस्कार केंद्रासमोर एकच गर्दी केली होती.
औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्धलेणीच्या पायथ्याशी उपासकांनी प्रज्ञासागर धम्म संस्कार केंद्रासमोर एकच गर्दी केली होती.

औरंगाबाद - धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) बुद्धलेणी परिसरात हजारो बौद्ध उपासक, उपासिकांचा जनसागर लोटला. शहरातही विविध ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी धम्मचक्र अनुप्रवर्तन केले होते. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्सव म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी सातपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील बुद्धलेणी परिसरात बौद्ध उपासक, उपासिकांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. सकाळी सात वाजता भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिसरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना आणि धम्मध्वजवंदन झाले. भदन्त विशुद्धानंद बोधी यांनी उपस्थित बौद्ध उपासक, उपासिकांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे महत्त्व पटवून दिले. प्रवचनानंतर भोजन दान व फळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध संस्था, सघटनांच्या वतीने अन्नदान, फळदान, पाणी वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाची गाणी अजय देहाडे, पंचशील भालेराव, मेघानंद जाधव यांनी येथे सादर केली. शहरातील विविध लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनीही बुद्ध लेणी परिसरात हजेरी लावली.

जयघोषाने परिसर गजबजला
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी शहर व जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका सकाळपासूनच येत होते. शहरातील नागरिकही मिळेल त्या वाहनाने विद्यापीठ परिसरात दाखल झाले. दुपारनंतर वाहनांचा ताफा वाढत गेला. दुचाकीपासून चारचाकी वाहनांवर येणाऱ्या तरुण मंडळींनी केलेल्या जयघोषाने विद्यापीठ परिसर अक्षरश: गजबजून गेला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘जय भीम’ अशा जयघोषात बौद्ध उपासक, उपासिकांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा केला. 

पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी
दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरात पुस्तक विक्रीचे अनेक स्टॉल लावण्यात आले होते. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह विविध समाजसुधारकांची चरित्रे, आंबेडकरी विचारधारेची पुस्तके खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली. विशेषतः भारतीय संविधानाच्या प्रतींची यावेळी मोठी विक्री झाली. पुस्तके खरेदी करणाऱ्यांत तरुणांची संख्या लक्षणीय होती.

चित्र प्रदर्शन ठरले आकर्षण
लेणी परिसरात दिवसभरात मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार केला. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे २२ प्रतिज्ञा आणि तथागत गौतम बुद्धांच्या जीवनपटावरचे चित्र प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. 

डॉक्‍टरांचा सत्कार 
या ठिकाणी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाठ, इम्तियाज जलील यांनी भेट दिली. या व्यासपीठावर आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. उन्मेष टाकळकर आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांना मानपत्र देऊन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बुद्ध-भीमगीतांनी केले मंत्रमुग्ध
या सोहळ्याच्या मुख्य धम्मपीठावर दिवसभर राजाभाऊ शिरसाठ, नागसेन सावदेकर, राहुल अन्वीकर, अजय देहाडे, पंचशीला भालेराव, संजना खंडारे, कुणाल वराळे यांच्या अनेक गायकांनी बुद्ध-भीमगीतांनी भीमसैनिकांना मंत्रमुग्ध केले. सोहळ्यासाठी धम्मभूमी येथील भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त डॉ. सत्यपाल, नागसेन, डॉ. चांद्रबोधी, समस्त भिक्‍खू संघ, श्रामणेर संघ, दौलत मोरे, स्वागताध्यक्ष विजय मगरे आणि इतरांनी पुढाकार घेतला. रात्री उशिरापर्यंत भीमगीतांचा कार्यक्रम सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com