बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे श्रेय कसले घेता धनंजय मुंडेचा सरकारला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

एकाच टप्यात मदत द्या,  नवनवीन निकष लावून शेतक-यांची थट्टा करु नका ! - धनंजय मुंडे 

बीड - गुलाबी बोंड अळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आधीच शेतक-यांची चेष्टा केली आहे. आता ही मदत आमच्यामुळेच मिळाली असे दाखवून त्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा मंत्र्यामध्ये लागली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची खरोखरच भावना असेल तर मदतीचे नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा करण्यापेक्षा एकाच टप्प्यात पूर्ण मदत द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मागील वर्षी आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संपूर्णपणे उध्वस्त झाला आहे या शेतकऱ्यांना एकरी 50000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांनी व विरोधी पक्षांनी सतत मागणी केल्यानंतरसुद्धा सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यासाठीही सहा महिने विलंब केला. मदत जाहीर केल्यानंतर ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. मदतीबाबत नवनवीन निकष लावून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. जाहीर केलेली मदतसुद्धा तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. या प्रक्रियेस किती वेळ लागेल हे सांगता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. असे असताना जाहीर झालेली मदत आपल्यामुळेच मिळाली असा आव आणत जिल्ह्यातील काही मंत्र्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. अशी टीका यावेळी मुंडे यांनी केली.

सरकारने बोंडअळीग्रस्त शेतक-यांना 37 हजार 500 रुपयाचे पॅकेज जाहीर केले होते. प्रत्यक्षात विमा कंपन्यांनी अद्याप मदत दिलेली नाही, पिक विमा कंपन्यांनी न्यायालयात जाऊन मदत देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

बोगस बी. टी. बियाणे उत्पादक कंपनी विरोधात का कारवाई केली नाही? शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची शासन का पाठराखण करत आहेत का? यामागचे नेमके गौडबंगाल काय आहे? असे अनेक प्रश्न मुंडे यांनी यावेळी उपस्थित केले.

Web Title: dhanajay munde asked questions to government