कट्टर विरोधक मुंडे भावंडे चक्क एका व्यासपीठावर, इथे आले एकत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

बीड जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे शुक्रवारी (ता. 17) पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगडावर एकत्र आले. 

बीड - राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे शुक्रवारी (ता. 17) एकाच व्यासपीठावर आले. त्याचे कारण ठरले पाटोदा तालुक्‍यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा. 

बीड जिल्ह्याच्या राजकारणात गडांना मोठे महत्त्व आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर शुक्रवारी संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा होता. या सोहळ्यानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री आणि राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हे दोघेही हजर होते.

हेही वाचा - बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

विधानसभा निवडणुकीनंतर ते दोघे प्रथमच एका व्यासपीठावर दिसले. तसे मागच्या सत्तेच्या काळातही दोघांनी एकत्र येणे टाळलेलेच होते. अगदी पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकासकामांच्या आढावा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना धनंजय मुंडे हजर नसत. राजकीय शिष्टाचारानुसार शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकांवर दोघांची नावे असली तरी ते एकत्र नसत; परंतु या कार्यक्रमानिमित्ताने दोघे एकत्र दिसले. 

हेही वाचा - राष्ट्रवादीचा वाटा पडला काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात

दरम्यान, मागच्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे गडावर जात; परंतु पहाटेच पूजा करून परतत असत. तर, मंत्री असल्याने पंकजा मुंडे मुख्य सोहळ्याला हजर राहून पूजा करत. या वेळी मात्र धनंजय मुंडे गुरुवारी रात्रीच गडावर मुक्कामी गेले होते. शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य पूजा झाली. त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमावेळी दोघेही एकाच व्यासपीठावर आले. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde-Pankaja Munde Came Together