ध्येयवेड्या गुरूजींची डिजीटल शाळा...! कुठली ती वाचा

dizital school.jpg
dizital school.jpg

नांदेड : प्रयत्नामुळे अगदी अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी देखील माणसाच्या आवाक्यात येतात जालीम विष प्याल्यास माणसाला प्राण गमवावे लागतात. पण विषाचा थोडा थोडा अंश पिण्याचा सराव करत जाणारे लोक क्रमाक्रमाने तो अंश वाढवत नेऊन तोळा तोळा विष देखील पचवू लागतात. एखादी गोष्ट असाध्य आहे, ती प्राप्त करणं कदापि शक्य होणार नाही, असं तिच्याविषयी वाटत असतं. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो, धडपडतो, यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीनं साध्य होते. हे घडू शकतं ते एका कठोर परिश्रमामुळे, प्रयत्नामुळे याचं जिवंत उदाहरण म्हणजे चंदनापरी देह झिजवणाऱ्या ध्येयवेड्या गुरुजींची बोरगावची ध्येयवेडी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी डिजिटल शाळा होय.

ऐतिहासिक वारसा लाभलेल बोरगाव
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात बोरगाव (आ) हे तीन हजार लोकसंख्या असलेलं छोटसं गाव आहे. बोरगाव या गावालाही ऐतिहासिक वारसा आहे. येथे जानेवारी महिन्यात श्री. विरशाप्पा महाराज व सय्यद सादाद यांची राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन देणारी हिंदू-मुस्लिम ऐक्याची संयुक्तपणे यात्रा भव्यदिव्य स्वरूपात भरते. या यात्रेत सकाळी सहा वाजता श्रींची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने निघते. 

जिजाऊ लेझीम पथकाचे आकर्षण
यात्रतील मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (आ.) येथील विद्यार्थांचे राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ लेझीम पथकाचे विविध गाण्यावरती होणारे पथसंचलन असते. या पथ संचलनांमध्ये विविध गाण्यावर लेझीमचे प्रकार शिस्तबद्ध, लयबद्ध पध्दतीने विद्यार्थी सादर करून डोळ्यांचे पारणे फेडतात. उपस्थित नागरिक बक्षीस रुपी कौतुकाची थाप देतात. जिल्हा परिषद शाळेच्या लेझीम पथकाचे सादरीकरण म्हणजे पंचक्रोशीतील हजारो लोकांसाठी पर्वणीच असते. बोरगाव जिल्हा परिषदेची शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असुन शाळेत एकूण १८७ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामध्ये ८० मुले व १०७ मुली आहेत. बोरगावची शाळा म्हणजे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांची निर्मिती करून अंमलबजावणी करणारी ध्येयवेडी डिजीटल, इतरांसाठी प्रेरक शाळा म्हणून परिचित आहे.

शाळेचे कृतीशिल शिक्षक
या शाळेत उच्चशिक्षित, उपक्रमशील, सृजनशील, अभ्यासू, व्यासंगी शिक्षक कार्यरत आहेत. शाळेचे कृतिशील मुख्याध्यापक बालकिशन देशमुख, प्राथमिक पदवीधर शिक्षक रमेश पवार, प्राथमिक शिक्षक संतोष कुलकर्णी, श्री.अंबर फुलसे, श्री. राहुल हारडे, सौ. सुचिता गोधने, सौ.ज्योती फुके हे सर्वच शिक्षक ध्येयवेडे होवून अविश्रांत परिश्रम घेऊन विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहेत. शाळेतील सृजनशील, अभ्यासू, व्यासंगी शिक्षक रमेश पवार यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत नियमितपणे राबविले जातात. 

विविध उपक्रम : शिवारफेरी
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन निसर्गाच्या सानिध्यात शिवारफेरी काढली जाते. विद्यार्थ्यांना निसर्गातील घडणाऱ्या घटना, प्राणी, पक्षी, वनस्पती व झाडांची, पिकांची ओळख व्हावी आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!’ याअभंगा प्रमाणे विद्यार्थांचे निसर्ग प्रेम वाढीस लागावे.निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही भावना त्यांच्यामध्ये रूजून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता विकसित होते.

बालसभा
दर पंधरा दिवसांनी शाळेत बाल सभा घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा म्हणून विद्यार्थ्यांतून एकास अध्यक्ष केले जाते काही विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे केले जाते. बाल सभेत विविध विषय ठेवले जातात. त्यामध्ये विद्यार्थी उपस्थिती, दैनंदिन अभ्यास, स्वयं अध्ययन, गुणवत्ता, परिसर स्वच्छता, नवीन उपक्रम आदी विषयावर विद्यार्थ्याकडून चर्चा घडवून आणली जाते.

व्यक्तिपरिचय         
राष्ट्र निर्माणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान देऊन संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रेरक महामानवांचा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा. त्यांचे आदर्श काय आहेत? तत्वे काय आहेत? हे जाणून घेवून आचरणात आणण्यासाठी दररोज परिपाठात व्यक्तिपरिचय ठेवला जातो. दररोज एक विद्यार्थी परिपाठात एका महामानवावर मनोगत व्यक्त करतो. मनोगतातून त्यांचा जीवनवृत्तांत सांगतो. त्यामुळे विद्यार्थ्यात भाषण कौशल्य विकसित होण्यास मदत होते.

धागा शौर्य का, राखी अभिमान की
या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला शाळेची जेवढी विद्यार्थी संख्या आहे. त्या संख्येप्रमाणे विद्यार्थी स्वतः राख्या तयार करून, राख्या व पत्र देशाच्या सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना पोस्टाने पाठविल्या जातात. या मागचा उद्देश असा की भारतीय जवानांच्या त्यागाप्रती,सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करून राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाची भावना विद्यार्थ्यांत जागृत होते. 

कौन बनेगा विजेता
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आकर्षण निर्माण करण्यासाठी व  पाचवी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा सोपी जावी म्हणून एमपीएससी, यूपीएससी परीक्षा कायअसते? हे विद्यार्थ्यांना माहीत व्हावे म्हणून इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचे संख्येप्रमाणे गट पाडून कौन बनेगा करोडपती च्या धर्तीवर चार ते पाच राऊंडमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून स्पर्धा घेतली जाते. गुणदान देऊन विजेता घोषित केला जातो.

आॅक्सीजन पार्क 
ऑक्सिजनचे महत्त्व कळावे ऑक्सीजन देणाऱ्या वनस्पती, झाडे कोणती याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून रानतुळस वनस्पती, पिंपळ ही झाडे शाळेच्या परिसरात लावलेली आहेत.

अध्ययन कोपरे
सर्व वर्गात मराठी, इंग्रजी गणित, विज्ञान अध्ययन कोपरे तयार करण्यात आले असुन अध्ययन कोपरयात विषयाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी ऑफ तासिकेत त्या साहित्याचा वापर करून स्वयंअध्ययन करतात.

जयंती उत्सव 
शाळेत नियमितपणे शासन परिपत्रका प्रमाणे सर्वच महामानवांच्या जयंत्या वेगवेगळ्या पद्धतीने साजऱ्या केल्या जातात. त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून महामानवांच्या वेशभूषेत विद्यार्थी तयार केले जातात.

सांस्कृतिक महोत्सव
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून ता. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते.
   
प्रज्ञा प्रतिभावंतांचा गौरव सोहळा
गावातील दहावी, बारावी, बी.ए., बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी., एम.ए., एम.एड., पी.एच.डी., उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एम.बी.बी.एस., आय.आय.टी, इंजिनिअरींगला पात्र झालेले विद्यार्थी, MPSC,UPSC परीक्षेतुन पास झालेल्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा गौरव सोहळा शाळेत दरवर्षी घेतला जातो. यावर्षी MPSC मधुन विक्रीकर निरीक्षकपदी निवड झालेली कु. रेखा सुभाष पाटील हीचा गौरव करण्यात आला. जेणेकरून विद्यार्थांनी त्यांचे अनुकरण करून ध्येय ठरवावे असा त्यामागचा हेतू आहे.  

राष्ट्रीयआपत्ती मदत निधी
जुलै-आॅगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहानास प्रतिसाद देत गावात रॅली काढण्यात आली. यातून पूरग्रस्तासाठी मदत निधी गोळा करून तहसिलदार लोहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

तंबाखूमुक्त शाळा
सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्याने तंबाखूमुक्त मुक्त शाळेचे ११ निकष पुर्ण करून लोहा तालुक्यात प्रथम बोरगावची शाळा तंबाखूमुक्त करण्यात आली. 
 
शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य
शाळेच्या विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती सरपंच उपसरपंच गावकरी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. ‘शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा’ याप्रमाणे निस्वार्थ, समर्पक भावनेने काम करणारी शालेय व्यवस्थापन समिती आहे. ‘शिक्षण हे साध्य नाही साधन आहे.नवचैतन्य, संस्कृती, नवमानव आणि नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो’ असा विचार मांडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रेरित असणारे अध्यक्ष निवृत्ती पाटील, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील सरपंच गवळणबाई बारसोळे, उपसरपंच मारोती पाटील शाळेच्या सर्वांगीन उन्नतीसाठी सदैव मदतीचा हात पुढे करीत असतात. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी शाळेस प्रथम स्वतःचा लोकसहभाग देवून समितीच्या सहकार्याने गावातून एक लक्ष रुपयांचा लोकसहभाग जमा करून ज्ञान रचनावादावर आधारीत शाळेची नाविन्यपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या पाच वर्ग खोल्यास वॉल पुट्टी, दर्जेदार स्टाईल बसवून सिलिंग केलेली आहे. 

ग्रामपंचायतीकडून टिव्ही भेट
ग्रामपंचायतीने शाळेस ६५ इंची एलईडी दुरचित्रवाणी संच भेट दिलेली आहे. या एलईडीमध्ये इयत्ता पहिली ते सातवीचा अभ्यासक्रम अपलोड केलेला असून सर्व विद्यार्थी आज एलईडी वरील अभ्यासक्रम स्वतःशिकत आहेत. शाळेला लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के साहेब, DIET चे अधिव्याख्याता तथा लोहा संपर्क अधिकारी चंद्रकांत धुमाळे, शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती आंबलवाड, केंद्रप्रमुख डी. आर. शिंदे यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत आहे.   

एक कवी म्हणतो,
‘मंजिले उन्ही की पूरी होती है                   
जिनके सपनों मे जान होती है 
     पंख होनेसे कुछ नही होता,
    होसलो से उडान होती है’

या प्रमाणे प्रचंड आत्मविश्वासाने शिक्षकांनी स्वतःला झोकून देवून समर्पक भावनेने काम केल्यास निश्चितच ध्येयपूर्ती होईल.

शब्दांकन : रमेश पवार 
(प्राथमिक पदवीधर शिक्षक तथा लेखक,व्याख्याते)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरगाव (आ.) ता. लोहा, जि. नांदेड. ब्रम्हणध्वनी - ७५८८४२६५२१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com