मुरूडला धर्मादाय संस्थेचे राज्यातील पहिले डायलिसिस सेंटर

विकास गाढवे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्य दिनी बुधवारी (ता. १४) धर्मादाय आयुक्त डिगे यांच्या हस्ते या सेंटरचे झाले. सहकारमहर्षी नाडे अध्यक्षस्थानी होते. किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नेहमी डायलिसिस उपचार घ्यावे लागतात. शरीरातील सर्व रक्ताचे शुद्धीकरण करावे लागते. यासाठी रूग्णांना मोठा खर्च येतो.

लातूर : किडनीच्या गंभीर आजारात डायलिसिसचे उपचारासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च गरीब रूग्णांना परवडत नाही. अशा रूग्णांना धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून मोफत किंवा माफत दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात असे डायलिसिस सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यातून त्यांच्या कार्यालयाकडून धर्मादाय संस्थांना या डायलिसिस मशिन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमातून मुरूड (ता. लातूर) येथील क्षेत्र विकास समितीच्या सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे सेवाभावी रूग्णालयात राज्यातील पहिल्या डायलिसिस सेंटरची सुरूवात झाली आहे.

स्वातंत्र्य दिनी बुधवारी (ता. १४) धर्मादाय आयुक्त डिगे यांच्या हस्ते या सेंटरचे झाले. सहकारमहर्षी नाडे अध्यक्षस्थानी होते. किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना नेहमी डायलिसिस उपचार घ्यावे लागतात. शरीरातील सर्व रक्ताचे शुद्धीकरण करावे लागते. यासाठी रूग्णांना मोठा खर्च येतो. गरीब रूग्णांना हा खर्च परवडत नाही. राज्यात किडनीचे आजार असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील गरीब रूग्णांना मोफत व माफक दरात डायलिसीसच्या उपचाराची सुविधा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात धर्मादाय संस्थांच्या सहकार्यातून डायलिसिस सेंटर उभारण्याचे प्रयत्न श्री. डिगे यांनी हाती घेतले आहेत. यातूनच त्यांच्या कार्यालयाने एकाच वेळी डायलिसिस मशिनची खरेदी केली असून कमी किंमतीत या मशीन उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात मुरूड येथील सहकारमहर्षी नाडे सेवाभावी रूग्णालय व येथील विवेकानंद रूग्णालयाला या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मशीन येताच मुरूडच्या क्षेत्र विकास समिती या धर्मादाय संस्थेने आपल्या नाडे सेवाभावी रूग्णालयात तातडीने डायलिसिस सेंटरची उभारणी करून ऑपरेटर व अन्य खर्चाचा भार उचलणार आहे. यातूनच धर्मादाय संस्थांच्या पुढाकाराने राज्यातील पहिले डायलिसिस सेंटर उभारण्याचा मान या रूग्णालयाला मिळाला आहे.

या सेंटरमध्ये गरीब रूग्णांना मोफत डायलिसिस उपचाराची सुविधा देण्यात येणार असून अशा रूग्णांची यादी आरोग्य विभाग केंद्राला देणार आहे. गरजू रूग्णांनाही पन्नास टक्के सवलतीत हे उपचार देण्यात येणार असल्याचे क्षेत्र विकास समितीचे सचिव प्रवीण पाटील यांनी सांगितले. उदघाटनप्रसंगी रूग्णालयाच्या पुढाकाराचे कौतुक करून रूग्णांची संख्या पहाता येत्या काळात आणखी मशिन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. डिगे यांनी सांगून विवेकानंद रूग्णालयातील डायलिसिस सेंटरही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू रूग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी अनिल नाडे, हरिश्चंद्र माने, डॉ. ए. बी. छल्लाणी, डॉ. सूर्यकांत तोष्णीवाल, अॅड. विजय पाटील, गजानन साबळे, अमर नाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: dialysis center in Murud