डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांनाही फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

उस्मानाबाद - गेल्या काही वर्षांत शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. बहुतांश शेतकरी आता शेती मशागतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करीत आहेत; परंतु डिझेल दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्‍टरद्वारे नांगरणीचा दर प्रतिएकर दीड ते पावणेदोन पटीवर पोचला आहे. 

उस्मानाबाद - गेल्या काही वर्षांत शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. बहुतांश शेतकरी आता शेती मशागतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करीत आहेत; परंतु डिझेल दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ट्रॅक्‍टरद्वारे नांगरणीचा दर प्रतिएकर दीड ते पावणेदोन पटीवर पोचला आहे. 

जिल्ह्यात एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे पशुधन जगविणे शक्‍य होत नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बैलबारदाना मोडीत काढला आहे. असे शेतकरी शेतीच्या मशागतीपासून पिकांच्या काढणीपर्यंतची कामे यंत्राद्वारेच करून घेत आहेत. त्यात उन्हाळ्यामध्ये नांगरणी करणे, त्यानंतर खरीप व रब्बी हंगामांत पेरणी करणे, मोगडा, काढणी आणि मळणीची कामे यंत्रांद्वारे करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी, ग्रामीण भागात ट्रॅक्‍टरची संख्याही वाढली आहे. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व महिनाभरानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्‍यता असल्याने शेतीमध्ये पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. बैलबारदाना असलेले शेतकरी सकाळी लवकर शेतामध्ये जाऊन अकरापर्यंत मशागतीची कामे करीत आहेत. कडाक्‍याचे ऊन असल्याने सायंकाळी चारपर्यंत विश्रांती घेऊन पुन्हा सायंकाळी सातपर्यंत कामे करीत आहेत. बैलबारदाना नसलेले शेतकरी ट्रॅक्‍टरद्वारे मशागतीची कामे करून घेत आहेत. मात्र, यंदा ट्रॅक्‍टरने नांगरणीच्या दरामध्ये दीड ते पावणेदोन पटीने वाढ झाली आहे. 

गेल्यावर्षी ट्रॅक्‍टरने प्रतिएकर नांगरणीसाठी ८०० रुपयांपर्यंत दर होता. यंदा एक हजार ३०० रुपये यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरणीच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे ट्रॅक्‍टरमालक व चालक शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे जास्तीचा दर देऊन नांगरणी करून घेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. यंदा डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Web Title: diesel rate increase farmer