डिजिटल बना, कॅशलेस व्यवहार करा; पण सावधान!

मनोज साखरे
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

ऑनलाईन ट्रांझॅक्‍शनचे ऍप वापरताय ? पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने बिलाचे पैसे अदा करताय? डिजिटलायझेशनच्या जमान्यात तुम्हीही स्मार्ट होत आहात. सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी आग्रही होत असाल पण कॅशलेस व्यवहार करताना जरा जपून. तुमची माहिती, पासवर्ड मिळविण्याचा खटाटोप सायबर भामटे करीत असतात. त्यांची तुमच्या बॅंक खात्यावर नजर असू शकते. डिजिटल, कॅशलेस व्हा पण आधी तंत्रज्ञानही समजून घ्या.

ऑनलाईन ट्रांझॅक्‍शनचे ऍप वापरताय ? पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने बिलाचे पैसे अदा करताय? डिजिटलायझेशनच्या जमान्यात तुम्हीही स्मार्ट होत आहात. सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी आग्रही होत असाल पण कॅशलेस व्यवहार करताना जरा जपून. तुमची माहिती, पासवर्ड मिळविण्याचा खटाटोप सायबर भामटे करीत असतात. त्यांची तुमच्या बॅंक खात्यावर नजर असू शकते. डिजिटल, कॅशलेस व्हा पण आधी तंत्रज्ञानही समजून घ्या.

औरंगाबाद - कॅशलेस आर्थिक व्यवहार वाढण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. सर्व व्यवहार ऑनलाईन व्हावेत. पारदर्शकता यावी, यासाठी पावले उचलली जात आहेत; पण वाढत्या ऑनलाईन व्यवहारामुळे सायबर गुन्ह्यांची व्याप्ती मोठी होत आहे.

सायबर भामट्यांना नागरिकांना गंडवणे अधिक सुकर झाले आहे. ऑनलाईन व्यवहाराचा जेवढा जास्त उपयोग होईल तेवढीच ऑनलाईन गुन्ह्यांची शक्‍यता वाढीस लागणार आहे. अशा स्थितीत फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नजर बॅंकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डपासवर्डवर अर्थात तुमच्या पैशांवर असू शकते. अशांपासून सावध राहा, एक हलगर्जी आपणास नडू शकते.

कॅशलेससाठी हे लक्षात ठेवा
ऑनलाईन ट्रान्झेक्‍शनसाठी भारतीय बॅंकांचे अधिकृत अपॅस वापरावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ते अधिक सुरक्षित आहेत. ते वेळोवेळी अपडेट होतात, अशा ऍप्सवर रिसर्च टीम सदैव काम करीत असते.

काही खासगी ऑनलाईन ट्रान्झॅक्‍शन ऍप्स व त्यांच्या कंपन्या आमिष दाखवतात. ते सर्वच ऍप्स सुरक्षित असतील का, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. परदेशी तयार केलेल्या कंपन्यांच्या ऍप्सपेक्षा स्वदेशी ऑनलाईन्स ऍपसचा वापर करण्याचा सल्लाही काही तज्ज्ञ देतात.

बिल अदा करतेवेळी काही "सायबर तरबेज' आपले कार्ड स्कीमरच्या साह्याने कॉपी करून ठेवू शकतात. स्कीमर हार्डवेअर डिव्हाईस असून आपला पासवर्डही या तंत्रज्ञानाद्वारे त्यांना मिळू शकतो. कार्ड स्वत: स्वाईप करा, उघडरीत्या पासवर्ड प्रेस करू नका.

विविध प्रकारचे स्कीमर असतात. तसेच दुकान, हॉटेलांत सीसीटीव्ही कॅमेरे असतात. यातून पासवर्ड त्यांना लक्षात येऊ शकतो, त्यामुळे आपले डेबिट, क्रेडिटकार्ड डोळ्यांसमोरच यूज करण्याची सवय ठेवा.

कार्ड स्वाईप झाल्यानंतर मोबाईलमध्ये मेसेज आला का, योग्य पैसे कपात झाले का, हे तपासा. मॅसेज वाचा. जर एकाच स्वाईपवेळी दुसऱ्यांदा मॅसेज आला तर संशय घ्या.

ऑनलाईन पेमेंट करताना शक्‍यतो, स्वत:चे डिव्हाईस (उदा. मोबाईल, संगणक) असेल तर उत्तम. तज्ज्ञ सांगतात की या डिव्हाईसला सेफ गार्ड लावा, अँडीव्हायरस फिड करा अन अपडेटही करा. आठवड्यातून एकदा तरी डिव्हाईस स्कॅन करा.

पासवर्ड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ऑनलाईन पेमेंट करताना बॅक हॅकिंग होऊ शकते. पासवर्डसाठी बटन दाबताना मागून लक्ष देणारेही असतात. त्यांना टाळणे श्रेयस्कर.

अशी घ्या काळजी...
एटीएम सेंटर किंवा मशीनमध्ये छुपा कॅमेरा, स्कीमर नसल्याची खात्री करा.
एटीएमचा पीन टाकताना योग्य खबरदारी घ्या.
खात्रीशीर संकेतस्थळावरूनच ऑनलाइन खरेदी करावी.
ऑनलाइन खरेदी करताना व्हर्च्युअल की-बोर्ड वापरावा.
सार्वजनिक वायफायच्या ठिकाणी ऑनलाइन खरेदी टाळा.
यूझरनेम आणि पासवर्ड नेहमी बदलत ठेवावा.
ऑनलाइन बॅंकिंग झाल्यानंतर लॉगआउट विसरू नका.

सबकुछ मोबाईल
मोबाईल बॅंकिंग तंत्रज्ञानामुळे सर्वच सुविधा आता आपल्या हातात आल्या आहेत. त्यामुळे बॅंकखाते क्रमांक, एटीएम, क्रेडिट कार्ड, युझरनेम, पासवर्ड मोबाईलमध्ये ठेवणे घातकच आहे. या बाबी केवळ मनातच असाव्यात. कारण मोबाईल चोरी किंवा गहाळ झाला, चुकून कुणाच्या हाती पडला आर्थिक फटका बसू शकतो. अशावेळी मोठी रक्कम ट्रान्सफर होण्याआधी नेटबॅंकिंग बंद करायला बॅंकेला सांगा.

अशीही फसगत होऊ शकते
बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील सोळा आकडी क्रमांक विचारला जातो. सीसीव्ही क्रमांक अथवा कार्डची मुदत संपण्याची तारीख आणि एक्‍सपायरी डेट विचारली जाते. ती सांगितल्यानंतर तुमच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन बॅंकिंगद्वारे खरेदी किंवा एटीएममधून पैसे काढून घेतले जातात. बॅंकेत बनावट कागदपत्रे सादर करून क्रेडिट कार्ड घेऊन फसवणूकही होऊ शकते. बार, रेस्टॉरंट इत्यादींमध्ये पोर्टेबल मशीनवरून डेटा चोरीची शक्‍यता असते. मालवेअर सॉफ्टवेअर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल अथवा संगणकावरील हालचाली त्या व्यक्‍तीस दिसतात. त्यावरून युजरनेम, पासवर्डची माहिती घेऊन ऑनलाइन बॅंकिंगद्वारे फसवणूक तांत्रिकदृष्टीने शक्‍य आहे हेही लक्षात घ्यावे.

आपणाला तंत्रज्ञान अवगत नसते, तसेच आपण जागरूक नसतो, त्याचवेळी फसवणुकीची जास्त शक्‍यता असते. फ्री वायफाय कनेक्‍शन, ट्रान्झेक्‍शनसाठी सिक्‍युअर आहे का? हे तपासावे. इंटरनेटला डिव्हाईस जोडल्यानंतर त्याची हालचाल हॅकर बघू शकतात. त्यामुळे स्वत:चे इंटरनेट डिव्हाईस असावे. स्वत:च्या डिव्हाईसवरच व्यवहार करावेत. वायफाय पासवर्ड ओपन करू नये.
- वैभव कुलकर्णी, सायबरतज्ज्ञ

फसवणूक झाल्यास हे करावे...
डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी स्वत: योग्य ती खबरदारी घेतल्यास फसवणूक टाळता येईल. अशी घटना घडल्यास नागरिकांनी संबंधित बॅंकेशी तातडीने संपर्क साधून कार्ड बंद करावे. तसेच, सायबर गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांशीही संपर्क साधावा.

Web Title: digital cashless transaction, but alert