बीड जिल्ह्यात डिजिटल जुगाराचा नवा फंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

बीड - तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किंग गेमच्या माध्यमातून डिजिटल जुगार खेळला जात आहे. यामध्ये युवक तासन्‌तास मोबाईलमध्ये हा गेम पैशांवर खेळत आहेत. यामुळे जिल्ह्यात सध्या या गेमची क्रेझ निर्माण झाली असून, बहुतांश तरुणांच्या मोबाईलमध्ये लुडो किंग गेम दिसून येत आहे. 

बीड - तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किंग गेमच्या माध्यमातून डिजिटल जुगार खेळला जात आहे. यामध्ये युवक तासन्‌तास मोबाईलमध्ये हा गेम पैशांवर खेळत आहेत. यामुळे जिल्ह्यात सध्या या गेमची क्रेझ निर्माण झाली असून, बहुतांश तरुणांच्या मोबाईलमध्ये लुडो किंग गेम दिसून येत आहे. 

पूर्वी वर्दळीची ठिकाणे सोडून पत्ते किंवा वेगळ्या पद्धतीने जुगार खेळला जात. परंतु, सध्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल जुगाराची पद्धत आली असून, यामध्ये लुडो किंग नावाचा गेम सध्या लोकप्रिय होत आहे. या गेमच्या माध्यमातून जुगार खेळण्याचा फंडा सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील बस्थानक, चौक, मंदिरे, गल्ली यासह ग्रामीण भागातील कट्ट्यावर लुडो किंग गेम खेळला जात आहे. १०० रुपयांपासून २० हजारांपर्यंत डाव होत आहे. पूर्वी जुगार कानाकोपऱ्यात जाऊन खेळला जात असे; परंतु सध्या चौकाचौकांत लुडोचे डाव होताना दिसत आहेत. 

पोलिस कधी करणार कारवाई ? 
सध्या जिल्ह्यात डिजिटल लुडो किंगचा नवा जुगार आला असून हजारो रुपयांची उधळण या गेमवर होत आहे. यात विशेष म्हणजे हा गेम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असून त्यांना याचे व्यसन लागत आहे. यामुळे जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

लुडो खेळणे कायद्याने गुन्हा
मनोरंजनासाठी लुडो गेमची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु या गेमचा कुणी वाईट वापर करत असेल किंवा लुडो गेम पैशाने खेळला जात असेल, तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पैशाने लुडो खेळणाऱ्यांना पोलिसांनी जेलची हवा दाखवली होती. लुडोकिंग गेम पैशाने खेळणे कायद्याने गुन्हा आहे. 

काय आहे लुडो किंग गेम
लुडो किंग गेममध्ये चार किंवा सहा जणांचा सहभाग असतो, प्रत्येकाकडे चार-चार घोडे असतात. ज्याचे चारही घोडे सर्वप्रथम राऊंड मारून आत जातील, तो विजयी होतो व त्याला डावातील सर्व पैसे दिले जातात. 

आतापर्यंत लुडो गेमच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत व तसे आमच्याही निदर्शनास अद्याप आलेले नाही; परंतु लुडो गेमचा वापर जुगार खेळण्यासाठी होत असेल तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
- सुधीर खिरडकर, पोलिस उपअधीक्षक, बीड

Web Title: digital gambling in beed district