महामार्गाच्या भूसंपादनासाठी आता थेट वाटाघाटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

जालना - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या जमीन भूसंपादनासाठी लॅंड पुलिंग मॉडेलला वाढता विरोध पाहता राज्य रस्ते विकास महामंडळाने एक पाऊल मागे घेतले आहे. शेतकऱ्यांसोबत आता थेट खासगी वाटाघाटी करून जमिनीचा मोबदला निश्‍चित केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

710 किलोमीटर लांबी असलेला हा समृद्धी महामार्ग राज्यातील अकरा जिल्ह्यांतून जाणार आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील 40 गावांमधील शेकडो हेक्‍टर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी शासनाने निश्‍चित केलेल्या लॅंड पुलिंग मॉडेलबाबत शेतकऱ्यांमध्ये सुरवातीपासूनच संभ्रम आहे. शेतकरी हक्क बचाव व कृती समितीने खासगी वाटाघाटींचा रेटा लावून धरला आहे.

त्यामुळे जमिनीच्या संयुक्त मोजणीसाठी गावपातळीवर जाणारे महसूलचे अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहे. हे लक्षात घेता शासनाने लॅंड पुलिंग मॉंडेल व रेडीरेकनरच्या चार पट हे दोन पर्याय कायम ठेवत खासगी वाटाघाटींचा तिसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली एक समिती नियुक्त केली जाणार आहे. रस्ते महामंडळाचे प्राधिकृत अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, तहसीलदार यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत महामार्गात जाणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी केली जाईल. हा मोजणी अहवाल नगररचना विभागाचे सहायक संचालक व जिल्हा सरकारी वकिलांच्या "सर्च रिपोर्ट'नंतर जिल्हास्तरीय समितीकडे पाठविला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जमिनीचा दर निश्‍चिती, रकमेचा तपशील शासनास कळविला जाईल.

Web Title: Direct negotiations for the acquisition of land for the highway