संकटांचा सामना करीतच सरले शेतकऱ्यांचे वर्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नुकसानीची भरपाई मिळेना; शेतमालाचे भावही पडलेलेच

लातूर - सुरवातीला दुष्काळी स्थितीमुळे पिके गेली, त्यानंतर अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला, सहा महिने उलटूनही शासनाकडून मदत मिळेना, त्यात बाजारात पडलेले भाव अशा सर्व संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वर्ष सरले. वर्षाअखेरीस रब्बी मात्र हाती आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

नुकसानीची भरपाई मिळेना; शेतमालाचे भावही पडलेलेच

लातूर - सुरवातीला दुष्काळी स्थितीमुळे पिके गेली, त्यानंतर अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला, सहा महिने उलटूनही शासनाकडून मदत मिळेना, त्यात बाजारात पडलेले भाव अशा सर्व संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वर्ष सरले. वर्षाअखेरीस रब्बी मात्र हाती आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

लातूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळत आहे. त्यात या वर्षी दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत्या. त्यामुळे रब्बीचे पीक हातून गेले. त्यानंतर पावसाळ्यात जूनच्या सुरवातीला जिल्ह्यात पाऊस झाला. त्यानंतर पावसाने खंड दिला. त्यानंतर पुन्हा चांगला पाऊस झाला. याचा परिणाम खरिपात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे सहा लाख तीन हजार हेक्‍टर क्षेत्र पेरणीयोग्य असताना प्रत्यक्षात मात्र सहा लाख १७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणीयोग्य क्षेत्र दोन लाख ७४ हजार हेक्‍टर असताना पेरणी मात्र चार लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर झाली होती. या वर्षी कधी नव्हे ते पीक जोमात राहिले. हे पीक हाताशी असतानाच जिल्ह्यात एकूण एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरीस चार-पाच दिवसांतच पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांतील हजारो हेक्‍टर क्षेत्राला मोठा फटका बसला. पीक, जमिनी वाहून गेल्या. या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार ४०७ शेतकऱ्यांना बसला. पाच लाख चार हजार ७३० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. यात पाच लाख तीन हजार ३८२ जिरायत, एक हजार २३५ बागायती, तर फळपिकांचे ११४ हेक्‍टरचा समावेश आहे. दुष्काळात ही पिके होरपळली आहेत. या दोन्हींची नुकसान भरपाई शासनाने अद्यापही दिलेली नाही.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगाम मात्र चांगला जात आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र एक लाख ७१ हजार हेक्‍टर असताना दोन लाख ९५ हजार हेक्‍टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. १७१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बीचे पीकही चांगले आहे. हा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आहे.

या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. खरिपात दोन लाख ७४ हजार हेक्‍टर क्षेत्र असताना चार लाख आठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. सध्या येथील अडत बाजारात ४० हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक होत आहे. पण भाव मात्र पडलेलेच आहेत. तीन हजार रुपये क्विंटलवर भाव जात नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

Web Title: disaster the farmers face trials went year