डिस्काउंटच्या नावावर खपविल्या दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने बीएस-3 इंजिन बंदीचा निर्णय घेतला आणि गुरुवारी (ता. 30) शहरवासीयांनी पुन्हा एकदा पाडव्याप्रमाणेच दुचाकी खरेदी केल्या. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या बख्खळ डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी शहरवासीयांनी वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी केली होती. 

औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने बीएस-3 इंजिन बंदीचा निर्णय घेतला आणि गुरुवारी (ता. 30) शहरवासीयांनी पुन्हा एकदा पाडव्याप्रमाणेच दुचाकी खरेदी केल्या. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या बख्खळ डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी शहरवासीयांनी वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये गर्दी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने अधिक प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या बीएस-3 इंजिन असलेल्या गाड्यांच्या विक्रीवर 1 एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी (ता.29) घेतला. त्यामुळे शोरूमधारकांकडे असलेल्या वाहनांच्या स्टॉकबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. शहरात विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांकडे सुमारे पंधराशेहून अधिक दुचाकी वाहने उपलब्ध होती. या गाड्या एक एप्रिलनंतर विक्री करणे शक्‍य नसल्यामुळे विक्रेत्यांनी तीन ते बावीस हजारांचे डिस्काउंट जाहीर केले. या डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी शोरूममध्ये तोबा गर्दी केली. फायनान्ससाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गर्दी झाली होती. कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होताच लोकांनी गाड्यांचा ताबा घेऊन त्यावर स्वार होण्याचा आनंद घेतला. नुकताच गुढीपाडवा झाला. पाडव्याच्या मुहूर्तावर गाड्यांची विक्रमी विक्री झाली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली. त्यामुळे नागरिकांनी जोरदार खरेदी करून आठवडाभरातच दुसऱ्यांदा पाडवा साजरा केला. दिवसभरात शहरातील विविध शोरूममधून हजार ते बाराशे गाड्यांची विक्री झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

भाऊ गाड्या संपल्या... 
गाड्यांच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळत असल्याचे कळताच जो तो आपल्या आवडीची दुचाकी घेण्यासाठी शोरूमकडे धावला. चौकशी काउंटरवर विचारणा करणाऱ्यांना सुधारित किमतीची माहिती दिली जात होती आणि येथेच गाडीच्या बुकिंगसाठीची प्रक्रियाही केली जात होती. विचारणा करताना एखाद्या मॉडेलचा स्टॉक संपला की त्याचीही माहिती दिली जात होती. सायंकाळी पाचला कोटेशन घेण्यासाठी गर्दी कायम होती. यावेळी एका कर्मचाऱ्याने चौकशी काउंटरवर येत सांगितले, भाऊ गाड्या संपल्या आणि गाडी घेण्याच्या आशेने गर्दीत उभे असलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाला. 

पाडव्यामुळे स्टॉक कमी 
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला वाहनांसह अन्य खरेदी होते. दोन दिवसांपूर्वीच गुढीपाडव्यानिमित्त गाड्यांचा मोठा स्टॉक व्यावसायिकांनी मागविला होता. यातील बहुतांश गाड्या पाडव्याच्या दिवशी विक्री झाल्या. तरीही शहरातील अनेक विक्रेत्यांकडे पंचवीस ते तीस टक्के स्टॉक शिल्लक राहिला होता. हा स्टॉक 1 एप्रिलनंतर विकता येणार नसल्याने त्यावर डिस्काउंट देण्यात आले. 

दीड हजार जणांकडून चौकशी 
शहरात गुरुवारी (ता. 30) दुचाकी विकणाऱ्या गाड्यांच्याच शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. या शोरूममध्ये बीएस-3 ऐवजी बीएस फोरचीच वाहने विक्रीसाठी उपलब्ध होती. तसा फलक या विक्रेत्याने शोरूम उघडतानाच लावला होता. असे असतानाही लोकांनी आशेपोटी बीएस-3 इंजिनच्या गाड्यांची चौकशी केली. दिवसभरात दीड हजार लोकांनी आपल्याकडे याबाबत विचारणा केली असल्याची माहिती जालना रोडवरील अरिहंत मोटर्सच्या वतीने सांगण्यात आली. 

दुपारनंतर बदलले चित्र 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बीएस-3 इंजिन असलेल्या गाड्यांचे काय करायचे या विवंचनेत असलेल्या विक्रेत्यांनी गुरुवारी (ता.30) सकाळी आरटीओ कार्यालय गाठले. त्याच्यातून तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्यावर दुपारी डिस्काउंट जाहीर करत कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित केले. त्याला लोकांनी प्रतिसाद देत वाहन खरेदी केली. डिस्काउंट ऑफरची माहिती व्हॉट्‌सऍपमुळे व्हायरल झाली आणि ज्याने हा संदेश वाचला तो आपल्या जवळच्यांना गाडी घेण्याबाबात विचारणा करत असल्याचे चित्र होते. 

विक्रीसाठी वेळ हवा होता - वाघ 
बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांची विक्री करण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला असता तर विक्रेत्यांना या गाड्या तोट्यात विकण्याची वेळ आली नसती. पाडव्यामुळे स्टॉक कमीच होता. ज्यामुळे ही विक्री थोडी सोयीची झाली असल्याचे दुचाकी विक्रेते विनोद वाघ यांनी सांगितले. 

गाडी खरेदीला झुंबड ः अवस्थी 
वाहनांच्या खरेदीसाठी दुपारी एकच गर्दी झाली. अनेक गाड्यांच्या खरेदीवर भक्कम सूट देण्यात आली असल्याने ग्राहकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि खरेदी केली. स्टॉक संपल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दुचाकी शोरूममधील कर्मचारी विजय अवस्थी यांनी सांगितले. 

Web Title: Discount on the name of the bike selling