बनोटी मंडळात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

कपाशी
कपाशी

बनोटी, ता. 23 (बातमीदार) ः बनोटी (ता. सोयगाव) मंडळात गेल्या एक महिन्यापासून पडत असलेल्या भिजपावसाने कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


बनोटी मंडळात गेल्या तीन वर्षांपासून सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. येणारा हंगाम चांगला होईल या आशेवर नव्या उमेदीने शेती कामात झोकून देत जीवापाड मेहनत घेत शेतकरी मशागतीला लागला होता. शेती तयार झाली नजरा आभाळाकडे लागल्या, जूनच्या शेवटच्या आठवड्यात सरी बरसल्याने पेरणी, लागवड केलेले रोपटे वाढू लागले. कमी-अधिक पावसात पिके डोलू लागली. तशी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. मात्र, बेभरवशी पावसाने दगा दिला. तीन आठवडे विश्रांती घेऊन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतलेला पाऊस सरीवर सरी कोसळत वीस दिवस उलटूनही बरसतच राहिल्याने शिवार चिंब भिजून पाणीच पाणी दिसू लागले.

निम्म्या अधिक क्षेत्र असलेली मुरमाड, खडकाळ जमिनीवरील पिकांची पाने लाल, पिवळी पडून पाने, फुले गळून माना टाकायला लागली आहेत. मुखेड, पळाशी, वाडी, हनुमंतखेडा, घोरकुंड, तिडका, नांदगाव, घोसला शिवारातील जवळपास हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, तर मका, उडीद, मूग, तूर ही पिके वाया गेली. हंगामातील एकमेव आर्थिक उलाढालीचे कपाशी पीक तेही वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेले दुष्टचक्र पिच्छा सोडायला तयार नाही. मात्र, कृषी विभाग, महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


वीस जुलैपासून सुरू झालेला पाऊस आजपर्यंत पडल्याने शेतात पाणी साचून शेवाळ तयार झाले आहे. पाच एकर क्षेत्रातील कपाशी, मका पावसाने ताण दिल्याने वाळले आहे. आता संसाराचा गाडा कसा चालवायचा याची चिंता पडली आहे.
- लक्ष्मण सोनवणे, शेतकरी, बनोटी.

 


शेतात साचलेले अतिरिक्‍त पाणी शेताबाहेर काढून कापूस पिकाच्या खोडाजवळ कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड व स्ट्रेप्टोसायक्‍लीन यांची ड्रेंचिग करावी. त्यामुळे आकस्मिक मर रोगास प्रतिबंध करता येईल.
- संभाजी पाटील, कृषी सहायक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com