लातूर जिल्ह्यातील पाच हजार जलस्त्रोताचे निर्जंतुकीकरण

विकास गाढवे
रविवार, 8 जुलै 2018

पावसाळा सुरू होताच सार्वजनिक योजनेतील स्त्रोतांचे पाणी दुषित होऊन ग्रॅस्टोसारख्या विविध रोगांची साथ पसरते. वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या साथरोगांचा सामना करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्ह्यातील विविध गावांच्या पाणी योजनांच्या स्त्रोताचे शंभर टक्के निर्जंतुकीकरणकरण्याची मोहिम हाती घेतली आहे. येत्या 24 जुलैपर्यंत ही मोहिम फत्ते करण्याचा चंग जिल्हा परिषदेने बांधला असून गावागावातून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वतः डॉक्टर असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या संकल्पनेतील ही मोहिम असून साथरोगाला रोखण्याचा जिल्हा परिषदेचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

लातूर: पावसाळा सुरू होताच सार्वजनिक योजनेतील स्त्रोतांचे पाणी दुषित होऊन ग्रॅस्टोसारख्या विविध रोगांची साथ पसरते. वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या साथरोगांचा सामना करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्ह्यातील विविध गावांच्या पाणी योजनांच्या स्त्रोताचे शंभर टक्के निर्जंतुकीकरणकरण्याची मोहिम हाती घेतली आहे. येत्या 24 जुलैपर्यंत ही मोहिम फत्ते करण्याचा चंग जिल्हा परिषदेने बांधला असून गावागावातून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्वतः डॉक्टर असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्या संकल्पनेतील ही मोहिम असून साथरोगाला रोखण्याचा जिल्हा परिषदेचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी ही माहिती दिली. ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी जागरूक झाले आहेत. यातूनच ग्रामपंचायतीच्या पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची जलसुरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्याच्यावर सार्वजनिक जलस्त्रोताचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याला आरोग्य विभागाकडून पाणी निर्जंतुकीकरणाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नमुन्यांच्या तपासणीत पाणी दुषित आढळून आल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. पाण्याच्या प्रमाणात टीसीएलचे मिश्रण पाण्यात मिसळण्यात येते. त्यासाठी 33 टक्के क्लोरिनयुक्त व आयसीआय मार्क असलेल्या टीसीएलचा ग्रामपंचायतीने पुरवठा करण्यात आला आहे. यात हातपंप व विद्युतपंपाचे क्लोरीश वॉश तर विहिरींचे क्लोरीनेशन करण्यात येते. पाणी दुषित आढळल्यानंतर ही प्रक्रिया करण्याऐवजी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व चार हजार 873 स्त्रोताचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम गुरूवारपासून (ता. 5) हाती घेतली आहे. दोन दिवसात या मोहिमेला जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला असून गाव पातळीवरील पदाधिकारी, ग्रामसेवक व जलसुरक्षक मोहिमेत योगदान देत असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

चार ग्रामसेवकांना नोटीसा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत चार गावात सार्वजनिक स्त्रोतातील पाणी दुषित आढळून आले. यात ग्रामसेवक व सरपंचांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. यामुळे गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आली असून ग्रामसेवकांवर निलंबनाची तर सरपंचांवर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अंबुलगा (ता. निलंगा) व तांदुळजा (ता. लातूर) तर दुसऱ्या टप्प्यात शेंद आणि अंबुलगा (ता. निलंगा) येथील ग्रामसेवकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संजय तुबाकले यांनी दिली.

पावसाळा सुरू होताच भुजलाची पातळी वाढून जलस्त्रोताचे पाणी दुषित होते. यामुळे ग्रॅस्ट्रो, कॉलरा, अतीसार, कावीळ, विषमज्वर, पोलिस आदी जलजन्य आजारांची साथ सुरू होते. जलवाहिनी व व्हॉल्व्हवरील गळत्या, स्त्रोताच्या सभोवतालचा अस्वच्छ परिसर, टीसीएल पावडर नसणे, त्याचा नियमित वापर न करणे, पाणी सोडणारा कर्मचारी प्रशिक्षित नसणे आदी करणांमुळे सार्वजनिक स्त्रोताचे पाणी दुषित होते. यंदा असे प्रकार होणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेण्यात येत असून शंभर टक्के जलस्त्रोताचे निर्जंतुकीकरण हा त्याचाच भाग आहे. साथरोग उदभवल्यास लागणाऱ्या औषधी आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आल्या असून दुषित पाणी पुरवठा केल्यास संबंधित गावच्या सरपंच व ग्रामसेवकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Disinfection of five thousand water sources in Latur district