शेतकऱ्यांना धान्य वाटप ही क्रूर चेष्टाच - विजयअण्णा बोराडे

शेतकऱ्यांना धान्य वाटप ही क्रूर चेष्टाच - विजयअण्णा बोराडे

जालना - शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो, त्यालाच धान्य वाटप होते ही किती क्रूर चेष्टा आहे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्‍त केले. आज संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत समाज गप्प बसणार काय, असा सवालही त्यांनी केला.

बठाण बुद्रुक (ता. जालना) येथे रविवारी (ता.१७) रोजी तिसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनात शेती, शेतकरी आणि वर्तमान यावरील मुक्‍तसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्रमिक मुक्‍तीचे अध्यक्ष भारत पाटणकर उपस्थित होते. दरम्यान, या संमेलनात मुक्‍तसंवाद, महिलांचे अनुभव कथन, कविसंमेलन आणि कथाकथन कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला. 

मुक्‍त संवादमध्ये बोलताना श्री. बोराडे यांनी आजचे वास्तव चित्रण मांडले. शेतीचे अनेक प्रश्‍न अन्‌ समस्यांना समाज अन्‌ राजकारण कसे जबाबदार आहेत, हे पटवून सांगितले. आज संस्कारपीठ हरवत चालले आहे. घरात संस्कार देणारे मायमाऊलींना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो याचे भयानक परिणाम कुटुंब व्यवस्थेवर कसे होतात हे श्री. बोराडे यांनी नमूद केले. या वेळी श्री. पाटणकर यांनी विषयाच्या संदर्भाने आपले मत मांडले. 

कविसंमेलनाने आणली रंगत...
कवी शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. या वेळी शंकर वाडेवाले यांनी माऊली कविता सादर करून उपस्थितांना गहिवरून आले.

अनुभवकथनातून मांडली कृषी उद्योजकता
साहित्य संमेलनातील अनुभव कथन कार्यक्रमात शेती उद्योजिका सीताबाई मोहिते यांनी आपले अनुभव मांडताना उपस्थितांना अंतर्मुख केले. शिक्षण कमी असतानाही शेतीत आपण नवनवीन प्रयोग करीत देशाबाहेर आपले उत्पादन कसे नेऊ शकलो याचे अनुभव त्यांनी मांडले. परदेश प्रवासाचे अनुभव सांगताना शेतीत राबविलेले प्रयोग आणि फळप्रकिया उद्योगची वाटचाल कशी केली, याची माहिती दिली. विविध पुरस्कार मिळाले हे सांगतानाच शेतीत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कसे काम केले पाहिजे आणि घरसंसार चालविताना शेतीही कशी केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. या कार्यक्रमात गीता खांडेभराड यांनी शेतकरी संघटना आणि महिलांचे प्रश्‍न यावर आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला धुपे यांनी केले.

ग्रामीण भागातील संमेलनातून  लेखक-वाचकांत थेट संवाद : वैद्य
साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात प्रसिद्ध गीतकार डॉ. दासू वैद्य म्हणाले, की आज साहित्याच्या क्षेत्रात विचार करता मोठ्या साहित्य संमेलनापेक्षा गावोगावी वा ग्रामीण भागात होणारी संमेलने मला जास्त महत्त्वाची वाटतात. अशा संमेलनातून लेखक आणि वाचक यांचा थेट संवाद होत असतो. भूमी अन्‌ भूमिजन असा विचार घेत संमेलन होत आहे याचा अधिक आनंद आहे. कविता ही निरंतर असते त्यामुळे काळ बदलला तशी आविष्कार शैली मात्र बदलत असते. कवीने सभोवतालच्या वास्तवाचा परिघ विचारात घेऊन लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संमेलनात विविध ठराव
संमेलनात विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाचे वाचन डॉ. सर्जेराव जिगे यांनी केले. ठरावाला सूचक व अनुमोदन डॉ. दिलीप बिरूटे, प्रा. शिवाजी हुसे यांनी दिले. संमेलनात घेण्यात आलेल्या ठरावात, रोजगार हमी योजनेतून शेतीची कामे व्हावीत, ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, शासनाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, आद्य कवयित्री महदंबा यांचे रामसगाव हे शासनाने कवितेचे गाव म्हणून जाहीर करावे, दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज द्यावे आदींचा समावेश आहे.

‘उभ्या शिवारात जळती तुझ्या हृदयाचं दुःख मोठं’
या कवितेतून स्त्रीपणाच्या जगण्याच्या अन्‌ भोगण्याच्या व्यथा वेदनांचा आलेख मांडला. कवी नारायण खरात यांनी आई कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. सहज विसरता येत नाही या कवितेतून कवी दिगंबर दाते यांनी माणसाच्या स्वभावाचे चित्रण रेखाटले. कवी प्रभाकर शेळके गावकीचा बदलत जाणारा संदर्भ कवितेतून मांडला. कवी गोवर्धन मुळक यांनी देशभक्‍ती अन्‌ हुतात्मा जवानांचा संदर्भ मांडणारी कविता सादर करून वातावरण गंभीर केले. कविसंमेलनात कवी प्रदीप देशमुख, डॉ. अशोक पाठक, गणेश कंटुले, स्वाती रत्नपारखे, सुरेश कायटे आदींनी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. एकनाथ शिंदे व डॉ. राज रणधीर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com