जिल्हाबदलीची ३२२ शिक्षकांवर वेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार, सीईओंकडे पाठविला अहवाल

बीड - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बिंदुनामावली नव्याने तपासण्यात आली आहे. त्यानुसार मागासवर्गीय कक्षाने विविध प्रवर्गाचे तब्बल ४९२ शिक्षक अतिरिक्त ठरविले आहेत. शासनाने जिल्ह्याला वाढीव पदे देतानाच अतिरिक्त शिक्षकांचे बिंदुनामावलीनुसार समायोजन करावे, असे म्हटले होते. त्यामुळे प्रशासनाला आंतरजिल्हा बदलीने आलेल्या मात्र आता अतिरिक्त ठरणाऱ्या ३२२ शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवावे लागणार आहे. 

दरम्यान बिंदुनामावलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या ३२२ आंतरजिल्हा बदली शिक्षकांची यादी तयार असून ही यादी तसेच त्यांचे समायोजन इतर जिल्ह्यांत करण्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने सीईओ नामदेव ननावरे यांच्याकडे सादर केला आहे. 

जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदली आणि वस्तीशाळा शिक्षकांच्या बेकायदा नियुक्‍त्यांमुळे अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र शासनाने ७९३ वाढीव पदांना मान्यता दिल्यावर काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र बिंदुनामावली तयार करून त्यानुसार समायोजन करण्याचे आदेश त्यावेळी दिले होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाला बिंदुनामावली तयार करण्यास तब्बल वर्षभराचा कालावधी लागला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मागासवर्गीय कक्षाने ही बिंदुनामावली तपासून दिली. या तपासणीनुसार जिल्ह्यात आजघडीला सर्व प्रवर्गांची मिळून शिक्षकांची एकूण ९ हजार १३८ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ८ हजार ९८८ कार्यरत पदे असून ६५० पदे रिक्त आहेत, तर ४९२ पदे अतिरिक्त ठरली आहेत.

अतिरिक्त ठरलेल्या पदांमध्ये मूळ शिक्षकांची ५ पदे, वस्तीशाळा शिक्षकांची १६५ पदे तर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या ३२२ पदांचा समावेश आहे. शिक्षकांची पदे बऱ्यापैकी रिक्त असली तरी ज्या प्रवर्गाचे शिक्षक पाहिजेत त्यापैकी अधिक शिक्षक कार्यरत आहेत.

अतिरिक्त ठरलेल्या मूळ शिक्षकांना तसेच अतिरिक्त ठरलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना समायोजनासाठी परजिल्ह्यात पाठविण्यापासून दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याबाबत उशिराने निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र आंतरजिल्हा बदलीने आलेल्या व बिंदुनामावलीनुसार अतिरिक्त ठरविलेल्या ३२२ शिक्षकांच्या प्रवर्गाचा आढावा घेतल्यास यामध्ये विमुक्त जाती-अ प्रवर्गातील ४६, भटक्‍या जमाती-क प्रवर्गातील ५६, भटक्‍या जमाती-ड प्रवर्गातील १९९ तर खुल्या प्रवर्गातील २१ शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे सदर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३२२ शिक्षकांवर पुन्हा जिल्हा बदलीची वेळ आली आहे.

Web Title: district change 322 teachers on time