जिल्हा परिषदेने लावले सभापतींच्या दालनाला कुलूप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद प्रशासनाने अजब कारभार करीत मुदत संपण्यापूर्वीच चार सभापतींच्या दालनाला मागील दोन दिवसांपासून कुलूप लावले. गुरुवारी (ता. दोन) दुपारपर्यंत चारही सभापतींच्या दालनाला कुलूप होते. एवढेच नाही तर दालनातील सभापतींचे स्वीय सहायक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे सभापतींचा कार्यकाळ मार्चपर्यंत आहे. असे असताना प्रशासनाने आचारसंहितेचा भलताच अर्थ काढत सभापतींच्या दालनाला थेट कुलूप लावले. त्यामुळे सभापती संतप्त झाले आहेत. 

औरंगाबाद - जिल्हा परिषद प्रशासनाने अजब कारभार करीत मुदत संपण्यापूर्वीच चार सभापतींच्या दालनाला मागील दोन दिवसांपासून कुलूप लावले. गुरुवारी (ता. दोन) दुपारपर्यंत चारही सभापतींच्या दालनाला कुलूप होते. एवढेच नाही तर दालनातील सभापतींचे स्वीय सहायक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे सभापतींचा कार्यकाळ मार्चपर्यंत आहे. असे असताना प्रशासनाने आचारसंहितेचा भलताच अर्थ काढत सभापतींच्या दालनाला थेट कुलूप लावले. त्यामुळे सभापती संतप्त झाले आहेत. 

जिल्हा परिषद प्रशासनाने कुलूप लावताना या बाबत साधी कल्पनाही दिली नाही, असा आरोप सभापतींनी केला आहे. 31 जानेवारीला चार सभापतींच्या दालनातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आदेशाचे पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. आचारसंहिता असली तरी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात बसता येते. तसेच बैठका घेऊन चर्चासुद्धा करता येते. मात्र, धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. आचारसंहितेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार सभापतींचे वाहन जमा करण्यात आले आहे. आता पदाधिकारी जिल्हा परिषदेत जास्त वेळ येत नसल्याने 31 जानेवारीला सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाने महिला व बाल कल्याण, समाज कल्याण, शिक्षण व आरोग्य, बांधकाम व अर्थ समिती सभापती या चार सभापतींच्या दालनातील स्वीय सहायक, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्यामुळे विभागात जाण्याचे सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी त्यांच्या मूळ विभागात सध्या गेले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार 
गुरुवार (ता. दोन) चारही सभापतींच्या दालनाला कुलूप होते. येथे कर्मचारीसुद्धा नव्हते. विशेष म्हणजे शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी चार फेब्रुवारीला समितीची मासिक बैठक बोलविली आहे. महिला बाल कल्याण समिती सभापतींना; तर दालनाला कुलूप लावले, याची माहितीसुद्धा नव्हती. आता सभापतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच दालनाला कुलूप लावल्याने अधिकारावर गदा आणल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. 

आमचा कार्यकाळ संपलेला नाही. कोणत्या कायद्यानुसार आमच्या दालनाला कुलूप लावले ते सांगावे. आचारसंहिता असली तरी लोक अनेक कामे अजूनही घेऊन येतात. दालनाला कुलूप असेल; तर चुकीचा अर्थ काढला जातो. यामध्ये कार्यकाळ संपलेला नसताना आमच्या अधिकारांवर गदा आणली गेली आहे. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी यांच्याकडे याची तक्रार करणार आहे. 
- विनोद तांबे, शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद. 

माझ्या दालनाला कुलूप लावले, याची कल्पना मला प्रशासनाने दिली नाही. पुढील नवीन सभापती येईपर्यंत आमचा कार्यकाळ आहे. आमचा कार्यकाळ संपलेला नसताना दालनाला कुलूप लावणे योग्य नाही. याची आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू. 
- सरला मनगटे, महिला व बाल कल्याण समिती सभापती, जिल्हा परिषद. 

आमचा कार्यकाळ मार्च महिन्यापर्यंत आहे. प्रशासनाने हे सर्व करताना आम्हाला साधी कल्पनासुद्धा दिली नाही. यामध्ये ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. 
- संतोष जाधव, बांधकाम व अर्थ समिती सभापती, जिल्हा परिषद.

Web Title: District Council put locks