जिल्हा परिषद, पंचायतची एकाच वेळी मतमोजणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 23) सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात होईल. जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणाची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा पंचायत समितीचे निकाल हाती येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आता मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. 

लातूर - जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 23) सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात होईल. जिल्हा परिषदेचा गट व पंचायत समितीच्या गणाची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा पंचायत समितीचे निकाल हाती येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आता मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी व दहा पंचायत समितीच्या 116 गणांसाठी निवडणूक झाली आहे. गुरुवारी मतमोजणी होईल. दहाही तालुक्‍यांच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. प्रत्येक तालुक्‍यात जेवढे गट व गण आहेत तेवढे टेबल मतमोजणीसाठी असणार आहेत. त्यामुळे एक गट व त्या गटातील दोन गणांची एकाच वेळी मतमोजणी सुरू केली जाणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, मशीन हाताळण्यासाठी मास्टर ट्रेनर व एक कर्मचारी कार्यरत असणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी लेखाधिकाऱ्यांचे पथक कार्यरत राहणार आहे. 

जेवढे मतदान केंद्र आहेत तेवढ्या मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीनिहाय मतांची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. गट व गणाची एकाच वेळी मतमोजणी केली जाणार असल्याने गणाचे निकाल लवकर जाहीर होणार आहेत. गटाच्या निकालाला मात्र थोडा उशीर लागणार आहे. ज्या ठिकाणी मतदान केंद्र जास्त आहेत त्या ठिकाणाचा निकालही हाती येण्यास उशीर होणार आहे. 

टपाली मतांची मतमोजणी करण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असणार आहे. 
दरम्यान, मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला; तसेच ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी काही सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. 

""मतमोजणीची आकडेवारी तातडीने निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे. त्यानंतर आयोगाकडून विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र ऑनलाइन पाठविले जाणार आहे. त्यावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी सही करून ते विजयी उमेदवारांना देतील.''

- डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी. 

Web Title: District Council, at the same time Panchayat Poll