जागा मिळायला चार वर्षे; निधी मिळेना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

जागा घ्यायलाच चार वर्षे गेली
विस्तारित इमारत बांधकामासाठी जिल्हा रुग्णालयाकडे जागा नसल्याने त्यांनी गृह विभागाच्या जागेची मागणी केली. गृह विभागाकडून जागेची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, बीडच्या पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका होऊन सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन चार वर्षांनंतर मागच्या वर्षी गृह विभागाकडून जिल्हा रुग्णालयाला जागा ताब्यात मिळाली.

बीड - जिल्हा रुग्णालयातील सध्याची खाटांची संख्या आणि आंतररुग्णांच्या संख्येचे समीकरण एकदमच विरुद्ध आहे. त्यामुळे वाढीव २०० खाटांना पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. मात्र, गृह विभागाकडून जागा मिळायला चार वर्षे गेली. आता आरोग्य विभागाच्या ताब्यात जागा येऊन वर्षे लोटून इतर तांत्रिक बाबींची पूर्तता होऊनही इमारत बांधकामासाठी अद्याप एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. निधी कधी मिळणार आणि भूमिपूजन कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या खाटांची सध्याची क्षमता ३२० एवढी आहे. मात्र, 
आंतररुग्णांची संख्या नेहमीच पाचशेच्या पुढे असते. त्यामुळे रुग्णांची परवड होते. स्त्रीरोग विभागाच्या प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्‍चात कक्षांत महिलांना फरशीवर अंथरुण टाकून उपचार घ्यावे लागतात. 

बाळंत महिलांनाही नवजात बाळांसह असेच उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे खाटा वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने २०० खाटा वाढीवचा प्रस्ताव मंजूर केला. जागा ताब्यात येण्यासाठी चार वर्षे गेली आता इमारत बांधण्यास निधीची वाट पाहावी लागत आहे.

भूमिपूजन कधी अन्‌ बांधकाम कधी?
जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात जागा आल्यानंतर अंदाजपत्रक, नकाशा तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे गेला. बांधकाम विभागाने केवळ तांत्रिक मान्यतेलाच चार महिने लावले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी ८४ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे गेला आहे. त्यानंतर राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही झाले. त्यात एक रुपयाचाही निधी मिळाला नाही. आता उच्चस्तरीय समितीसमोर हा प्रस्ताव मांडला तर निधी मंजूर होऊन काही तरतूद होऊ शकते. निधी नसल्याने नव्या २०० खाटांच्या इमारतीचे भूमिपूजन कधी आणि बांधकाम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Hospital Place Issue Fund